Join us

मोनिका मोरे हिच्या दोन्ही हातांवर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया; ब्रेनडेड तरुणाचे बसवले हात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2020 6:29 AM

चेन्नईतील ३२ वर्षीय ब्रेनडेड तरुणाचे बसवले हात

मुंबई : रेल्वे अपघातात हात गमावलेल्या घाटकोपर येथील मोनिका मोरे हिच्या दोन्ही हातांवर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. चेन्नईच्या ग्लोबल रुग्णालयात ३२ वर्षीय तरुणाला ब्रेनडेड घोषित केल्यानंतर कुटुंबीयांच्या परवानगीनुसार त्याचे हात मोनिकाला बसवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुंबईतील ग्लोबल रुग्णालयातील प्रवक्त्याने दिली. युवक प्रतिष्ठान व ग्लोबल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने ही शस्त्रक्रिया पार पडली.

या ब्रेनडेड तरुणाचे हात २७ ऑगस्टला रात्री उशिरा चार्टर्ड विमानाने मुंबईला आणण्यात आले. रात्री १.४० वाजेपर्यंत हे विमान मुंबईत उतरले आणि १५ मिनिटांत ग्रीन कॉरिडोर करून ते ग्लोबल रुग्णालयात दाखल झाले. त्यानंतर लगेचच मोनिकाच्या हातांवर शस्त्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. ग्लोबल रुग्णालयातील कन्सल्टंट प्लॅस्टिक अ‍ॅण्ड रिकन्स्ट्रक्टिव्ह मायक्रोसर्जन डॉ. नीलेश सातभाई यांच्या नेतृत्वाखाली १२ डॉक्टरांच्या टीमने ही शस्त्रक्रिया केली आहे. यात प्लॅस्टिक सर्जन, मायक्रोव्हास्क्युलर आणि पुनर्रचनात्मक सर्जन, आॅर्थोपेडिक सर्जन आणि भूलतज्ज्ञ यांचा यात समावेश होता. या शस्त्रक्रियेनंतर मोनिकाला अतिदक्षता विभागात हलविण्यात आल्याची माहिती प्रवक्त्याने दिली.

टॅग्स :रेल्वे