मुंबई : मुंबई विमानतळावरुन मंगळवारी २२ विमानांनी टेकआॅफ केले, तर १९ विमानांचे आगमन झाले. तीन विमानांची उड्डाणे रद्द झाली. देशांतर्गत विमान प्रवास सुरु करण्याचा निर्णय झाल्यानंतर मंगळवारी दुसऱ्या दिवशी ४१ विमानांची वाहतूक झाली. या सेवेचा लाभ ४,२२४ प्रवाशांनी घेतला.
सहा विमानकंपन्याद्वारे ही वाहतूक करण्यात आली. १३ विविध सेक्टरमधून ही वाहतूक झाली. ३,११४ प्रवासी मुंबईतून बाहेरील शहरांत गेले तर १,११० प्रवासी मुंबईत आले. सर्वात जास्त प्रवासी मुंबई ते दिल्ली या मार्गावर प्रवास करणारे होते.
मुंबई विमानतळावरुन रांचीसाठी पहिल्या विमानाने सकाळी साडेसहा वाजता उड्डाण केले. तर सकाळी ८.२० वाजता लखनऊ येथून आलेल्या पहिल्या विमानाचे मुंबई विमानतळावर आगमन झाले. विमानतळावर येण्यासाठी व विमानतळावरुन घरी जाण्यासाठी रिक्षा, टॅक्सी पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने त्यावर विसंबून असलेल्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.
मुंबईत र्बोडिंग पास डिजिटल पास म्हणून ग्राह्य
विमान प्रवाशांसाठी खासगी वाहनांच्या पीकअप, ड्रॉप सेवेसाठी त्यांचा र्बोडिंग पास हा डिजिटल पास म्हणून ग्राह्य धरण्यात येत आहे. त्यामुळे त्यांना स्वतंत्र पास काढण्याची आवश्यकता नसल्याचे मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले आहेत. याला मुंबई पोलीस प्रवक्ते प्रणय अशोक यांनी दुजोरा दिला आहे.