उडान अंतर्गत ४६५ उड्डाणांद्वारे ८३५ टन वैद्यकीय सामग्रीची वाहतूक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2020 08:26 PM2020-05-07T20:26:39+5:302020-05-07T20:26:57+5:30
एअर इंडिया, अलायन्स एअर, भारतीय हवाई दल आणि खाजगी विमान कंपन्यांद्वारे लाईफलाईन उडान अंतर्गत 465 उड्डाणे चालविण्यात आली.
मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर देशातील विविध ठिकाणी वैद्यकीय सामग्री पोचवण्यासाठी हवाई वाहतुकीचा मोठा वापर केला जात आहे.
एअर इंडिया, अलायन्स एअर, भारतीय हवाई दल आणि खाजगी विमान कंपन्यांद्वारे लाईफलाईन उडान अंतर्गत 465 उड्डाणे चालविण्यात आली. यातील 278 उड्डाणे एअर इंडिया आणि अलायन्स एअर द्वारे चालवण्यात आली. याद्वारे आतापर्यंत 835.94 टन मालवाहतूक करण्यात आली आहे. लाईफलाईन उड्डाणांनी आतापर्यंत 4 लाख 51 हजार 38 किलोमीटरचे हवाई अंतर पार करण्यात आले.
कोविड-19 विरुद्ध भारताच्या युद्धाला पाठिंबा देण्यासाठी दुर्गम आणि डोंगराळ भागांसह देशातील सर्व भागात आवश्यक वैद्यकीय वस्तूंची वाहतूक करण्यासाठी एमओसीएमार्फत ‘लाइफलाईन उडान’ उड्डाणे चालविली जात आहेत.
पवन हंस लि. सह हेलिकॉप्टर सेवा पुरवण्यात आली आहे. जम्मू-काश्मीर, लडाख, बेटे आणि ईशान्य भागात महत्वपूर्ण वैद्यकीय सामान आणि रूग्णांची ने-आण करीत आहेत. पवन हंसने 5 मे 2020 पर्यंत 7 हजार 729 किलोमीटरचा हवाई प्रवास करत 2.27 टन मालवाहतूक केली आहे. ईशान्य भारत, बेट प्रदेश आणि डोंगराळ राज्यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. एअर इंडिया आणि आयएएफ ने प्रामुख्याने जम्मू आणि काश्मीर, लडाख, ईशान्य भारत आणि इतर बेट प्रांतासाठी सहकार्य केले आहे.
औषधे, वैद्यकीय उपकरणे आणि कोविड-19 मदत साहित्याच्या वाहतुकीसाठी पूर्व आशियासोबत कार्गो एअर-ब्रिजची स्थापन करण्यात आली आहे. एअर इंडियाने 972 टन वैद्यकीय वस्तूंची मालवाहतूक केली आहे.