लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आंतरराष्ट्रीय हवाई सीमा खुल्या होताच मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाने पूर्ण क्षमतने वाहतूक सुरू केली आहे. सध्या दररोज १५० विमानांची उड्डाणे निर्धारीत असून, येत्या काळात २३८ उड्डाणसंख्या गाठण्याचे लक्ष्य ठरविण्यात आले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून एअर बबल करारांतर्गत मर्यादित प्रमाणात आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक सुरू होती. त्यामुळे नोकरी वा शिक्षणानिमित्त परदेशात ये-जा करणाऱ्यांचे मोठे हाल होत होते. २७ मार्चपासून आंतरराष्ट्रीय विमानांवरील निर्बंध हटविल्याने कोरोनापूर्व काळाप्रमाणे विमानांचे संचालन करता येणार आहे. त्यामुळे तब्बल दोन वर्षांनी नियोजित वेळापत्रकानुसार पहिले विमान पहाटे १२.१७ वाजता शारजहाहून मुंबईत दाखल झाले तर १२.२९ वाजता दुसरे विमान फुकेतकरिता रवाना झाले. वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यामुळे दररोज १५० आंतरराष्ट्रीय विमानांची ये-जा अपेक्षित असल्याचे मुंबई विमानतळ प्रशासनाकडून सांगण्यात आले. प्रवाशांच्या मागणीनुसार, मुंबई विमानतळाने वॉर्सा, मॉस्को, हेलसिंकी, हो ची मिन्ह सिटी आणि हनोई आदी नवीन आंतरराष्ट्रीय ठिकाणे विमान वाहतुकीशी जोडली आहे. न्यूयॉर्क, सोल आणि ताश्कंद याठिकाणची वाहतूक मात्र अद्याप सुरू करण्यात आलेली नाही. दुबई, जेद्दाह, बँकॉक आणि अबुधाबीला सर्वाधिक बुकिंग मिळत असल्याची माहिती देण्यात आली.