हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत, गोवंडी स्थानकाजवळ रेल्वेरूळाला तडा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2017 09:28 AM2017-10-15T09:28:55+5:302017-10-15T11:29:30+5:30
मुंबईतील हार्बर मार्गावरील गोवंडी स्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. सात वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.
मुंबई - मुंबईतील हार्बर मार्गावरील गोवंडी स्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. सात वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मीनसकडं येणाऱ्या मार्गावर रुळाला तडा गेल्याचं समोर आलं. त्यामुळे अप मार्गावरील वाहतूक पूर्ण ठप्प झाली होती. मात्र, प्रशासनानं तात्काळ दुरुस्तीचं काम हाती घेतलं आणि दुरूस्तीचंम काम पूर्ण केलं. पण अजूनही या मार्गावरील लोकल उशिराने धावत आहेत.
आज रेल्वे प्रवाशांचे मेगाहाल! रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक
मध्य मार्गावरील कल्याण-ठाणे अप धिम्या मार्गावर आणि हार्बर मार्गावर नेरूळ ते मानखुर्द अप आणि डाऊन मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवरील मरिन लाइन्स-माहिम स्थानकांदरम्यान डाऊन धिम्या मार्गावर जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे.
मध्य मार्गावर कल्याण ते ठाणे स्थानकांदरम्यान अप धिम्या मार्गावर रविवारी सकाळी ११.१५ वाजल्यापासून दुपारी ४.१५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. यामुळे अप धिम्या मार्गावरील वाहतूक अप जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे. ब्लॉक काळात ठाकुर्ली, कोपर, मुंब्रा आणि कळवा अप मार्गावर लोकल थांबणार नाही. हार्बर मार्गावर नेरूळ ते मानखुर्द स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११.२० ते दुपारी ४.२० वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येईल. त्यामुळे सकाळी १०.२८ वाजल्यापासून दुपारी ३.३९ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणा-या पनवेल-वाशी-बेलापूरकडे जाणा-या सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. १०.५२ ते ४.१२ पर्यंत पनवेल-वाशी-बेलापूरहून सुटणा-या लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसएमटी-मानखुर्द आणि ठाणे-पनवेल मार्गावर विशेष लोकल चालवण्यात येतील.
पश्चिम मार्गावर जम्बो ब्लॉक
पश्चिम रेल्वेवर मरिन लाइन ते माहीम जंक्शन या डाऊन धिम्या मार्गावर सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत जम्बो ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे धिम्या मार्गावरील वाहतूक डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येईल. तसेच धिम्या मार्गावरील सर्व लोकलला लोअर परळ ते माहिम जंक्शनपर्यंत दोन वेळा थांबा देण्यात येईल.