Join us

रेल्वेने केली घरगुती अन्नधान्याची वाहतूक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2020 7:00 PM

भारतीय रेल्वेने ७ लाख ७५ हजार टन घरगुती (खासगी) अन्नधान्याची वाहतुक केली आहे. 

 

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांच्या घरातील स्वयंपाकाचा प्रश्न उभा राहिला आहे. मात्र लॉकडाउनच्या काळातही देशातील नागरिकांचा स्वयंपाक  सुरुच राहावा. यासाठी २५ मार्च ते २८ एप्रिल दरम्यान भारतीय रेल्वेने ७ लाख ७५ हजार टन घरगुती (खासगी) अन्नधान्याची वाहतुक केली आहे. 

जीवनावश्यक वस्तू, अत्यावश्यक सामग्री, शेतीतील माल वेळेत ग्राहकांपर्यत पोहोचविण्यासाठी भारतीय रेल्वेची मालगाडी, पार्सल सेवा, रो रो सेवा सुरू आहे.  फळ, भाजीपाला, दूध व दुग्धजन्य पदार्थ आणि बी-बियाणे यासह नाशवंत वस्तूंसाठी रेल्वेने पार्सल स्पेशल ट्रेनचे मार्ग निश्चित केले आहेत. त्यानुसार अन्नधान्य,पदार्थ पोहोचविण्यात येत आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा लॉकडाऊन दरम्यान मोठ्या प्रमाणात खासगी अन्नधान्याची वाहतुक करण्यात आलेली आहे. मागील वर्षी याच कालावधीमध्ये ६ लाख ६२ हजार धान्याची ने-आण केली होती. आंध्रप्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, राजस्थान आणि तामिळनाडू या राज्यातून सर्वाधिक घरगुती अन्नधान्याची वाहतुक केली आहे.

कोरोनामुळे देशातील सर्व वाहतुकीसह प्रवासी रेल्वे वाहतूक सेवा बंद आहे. फक्त पार्सल, मालगाडी सुरु आहे. दूध, धान्य, औषधे, वैद्यकीय उपकरणे, फळे, भाज्या, मासे, अंडी, बियाणे, टपाल पिशव्या, कच्चा माल, इंधन, सिमेंट यासारख्या जीवनावश्यक सामग्रीची वाहतूक केली जात आहे. मध्य, पश्चिम, कोकण रेल्वे मार्गावरून जीवनावश्यक सामग्रीचा पुरवठा कमी पडू नये, यासाठी रेल्वे प्रशासनाने मालगाडी, पार्सल गाडीच्या वेळेचे नियोजन केले आहे. या कामगिरीमुळे रेल्वे प्रशासन कोरोनाच्या युद्धात मोलाचे योगदान देत आहे. 

 

टॅग्स :अन्नरेल्वेकोरोना सकारात्मक बातम्याकोरोना वायरस बातम्या