लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : इथेनॉल हे पर्यावरणपूरक इंधन आहे जे पेट्रोलमध्ये मिसळण्यासाठी वापरले जात आहे. पुणे विभागामधील लोणी टर्मिनल हे १० ऑगस्ट २०२१ रोजी बीटीपीएन वॅगनमध्ये इथेनॉलची वाहतूक करणारे पहिले टर्मिनल बनले, जे रेल्वे आणि तेल विपणन कंपन्यांसाठी एक नवीन पाऊल आहे. भारतभर इथेनॉलचे उत्पादन असमतोल आहे. हे मुख्यतः महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि इतर काही राज्यांच्या साखर उत्पादक क्षेत्रात केंद्रित आहे.
इथेनॉल प्रामुख्याने उसापासून साखर काढल्यानंतर उरलेल्या अवशेषांमधून तयार केले जाते. साखरेचे जास्त उत्पादन आणि कमी मागणी लक्षात घेता, सध्या इथेनॉल हे साखर उद्योगाचे तारणहार ठरले आहे. एकूण गरजेच्या तुलनेत जवळजवळ सर्व साखर कारखान्यांची इथेनॉल उत्पादन क्षमता कमी आहे. मध्य रेल्वेचा पुणे विभाग आणि मेसर्स हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, लोनी यांनी आंध्र प्रदेशातील कडपा येथे पहिल्या १५ वॅगन लोड करण्यासाठी घेतलेले पाऊल योग्य दिशेने प्रगतीशील पाऊल आहे.
----
इथेनॉलचे फायदे
इथेनॉल हे एक पर्यावरणपूरक इंधन आहे. एकूण कार्बन उत्सर्जन कमी करण्यास आणि अशा प्रकारे स्वच्छ वातावरण निर्मितीस मदत करेल. रेल्वेला पर्यावरणपूरक इंधन वाहतूक क्षेत्राचा एक भाग बनण्याची नवी संधी मिळणार आहे. एक पर्यावरणपूरक राष्ट्र म्हणून भारताच्या सर्वांगीण विकास आणि उदयासाठी उपयोगी ठरणार आहे.