मुंबई - सोमवारी सकाळी तांत्रिक कारणास्तव घाटकोपर ते वर्सोवा या मेट्रो-१ मार्गावरील एक मेट्रो सकाळच्या सुमारास तांत्रिक कारणास्तव बंद पडली. यामुळे सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले. अंधेरी स्थानकावर प्रवाशांची गर्दी झाली. त्यानंतर मेट्रो प्रशासनाने बंद पडलेल्या मेट्रोची दुरूस्ती केली. सध्या घाटकोपर-वर्सोवा दरम्यानची वाहतूक सुरळीत सुरूअसल्याचे मेट्रो प्रशासनाने सांगितले. तसेच प्रवाशांच्या गैरसोयीबद्दल दिलगिरीही व्यक्त केली.
सकाळच्या सुमारास मेट्रो-१ मार्गावरील विमानतळ मेट्रो स्थानकाजवळ तांत्रिक कारणास्तव एक मेट्रो बंद पडली. यामुळे याठिकाणी प्रवाशी अडकून पडले होते. मेट्रो प्रशासनाने हा तांत्रिक बिघाड दूर करत मेट्रो पूर्ववत केली. मध्य आणि पश्चिम रेल्वेला जोडणाऱ्या घाटकोपर-अंधेरी- वर्सोवा या मेट्रो-१ मार्गिकेमुळे मुंबईकरांचा प्रवास वेगवान आणि सुखद झाला आहे. त्यामुळे अल्पावधीतच मेट्रो प्रवासाला लोकांनी पसंती दिली आहे. दिवसभरात लाखो प्रवासी मेट्रोने प्रवास करतात. सकाळच्या वेळेस तर मेट्रोमध्ये मुंबईतील लोकलइतकीच गर्दी असते. यावेळीच तांत्रिक बिघाड झाल्यामुळे कामानिमित्त निघालेल्या चाकरमान्यांची तारांबळ उडाली होती. परंतु, नंतर हा तांत्रिक बिघाड दूर केल्याने सध्या ही सेवा सुरळीत सुरू असल्याचे मुंबई मेट्रो प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.