Join us

पगारवाढीच्या घोषणेनंतर ST संपातील निलंबित कर्मचाऱ्यांबाबत परिवहनमंत्र्यांचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2021 7:17 PM

1 ते 10 वर्षे असलेल्या कर्मचाऱ्यांना मूळ वेतनात 5 हजार रुपयांची वाढ करण्यात आली. त्यामुळे, 12,395 रुपयांचे वेतन आता 17,395 रुपये. एकूण वेतन 24,594 एवढे होत आहे

ठळक मुद्देकामगारांनी उद्या सकाळी 6 वाजल्यापासून कामावर हजर राहावे. जे मुंबईत उपोषणासाठी, आंदोलनात बसले आहेत. त्या कामगारांनी परवा सकाळी 8 वाजेपर्यंत गावी जाऊन आपल्या कामावर उपस्थित राहावे, असे आवाहन परिवहनमंत्री अनिल परब यांनी केले आहे

मुंबई - राज्यभरात जवळपास गेल्या महिनाभरापासून सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर आज तोडगा निघण्याची शक्यता आहे. एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण व्हावं या आग्रही मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. मात्र, सध्या हा निर्णय कोर्टात असल्याने विलिनीकरणावर तातडीनं निर्णय घेता येणे शक्य नसल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केलंय. पण, एसटी कर्मचाऱ्यांना घसघशीत वेतनावाढ देण्याचा निर्णय परिवहनमंत्री अनिल परब यांनी जाहीर केला. तसेच, कामगारांनी संप समाप्त करुन कामावर हजर राहण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. 

1 ते 10 वर्षे असलेल्या कर्मचाऱ्यांना मूळ वेतनात 5 हजार रुपयांची वाढ करण्यात आली. त्यामुळे, 12,395 रुपयांचे वेतन आता 17,395 रुपये. एकूण वेतन 24,594 एवढे होत आहे. तर, 10 ते 20 वर्षांपासूनच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात 4 हजार वाढ. ज्यांचा 16 हजार होता, त्यांचा मूळ वेतन 23040 झालाय. एकूण वेतन 28 हजार झालाय. 20 वर्षांपेक्षा जास्त असलेल्या कर्मचाऱ्यांचं मूळ वेतन 2500 रुपयांनी वाढवलं आहे. त्यामुळे त्यांचे एकूण वेतन आता 41,040 झालंय, अशी माहिती परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली. तसेच, विलनीकरणाबाबत न्यायालयाच्या निर्णयानुसार समितीचा अहवाल येण्यास 12 आठवड्यांचा अवधी आहे. त्यानंतर, विलगीकरणाचा निर्णय होईल, असेही त्यांनी स्पष्ट केलं. 

कामगारांनी उद्या सकाळी 6 वाजल्यापासून कामावर हजर राहावे. जे मुंबईत उपोषणासाठी, आंदोलनात बसले आहेत. त्या कामगारांनी परवा सकाळी 8 वाजेपर्यंत गावी जाऊन आपल्या कामावर उपस्थित राहावे, असे आवाहन परिवहनमंत्री अनिल परब यांनी केले आहे. तसेच, जे कामगार निलंबित आहेत, त्यांचं हजर झाल्यानंतर निलंबन रद्द केलं जाईल. निलंबित झालेले कामगार हजर न झाल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे अनिल परब यांनी सांगितलं. दरम्यान, आत्महत्या केलेल्या कामगारांच्या कुटुंबीयांचा शासन सहानुभूतीपूर्वक विचार करेल, असे परब यांनी म्हटलं. पगाराची हमी आणि वेतनवाढ देण्याचा निर्णय शासनाने घेतला.  

टॅग्स :अनिल परबएसटी संपमुंबई