Join us

परिवहनमंत्र्यांची घोषणा हवेतच; सरकारमध्ये समन्वयाचा अभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2020 6:58 PM

रात्री निर्णयात बदल, परराज्यातील मजुरांना राज्यात येण्यासाठी आणि राज्यातून परराज्यात जाण्यासाठी एसटीची सेवा 

 

मुंबई : राज्यातील विविध भागात अडकलेले विद्यार्थी, मजुर,नागरिकांना एसटीचा आशेचा सूर्य मावळला आहे. कारण फक्त इतर राज्यातील अडकलेल्या मजुरांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत आणि इतर राज्यात अडकलेले जे महाराष्ट्राच्या सीमेवर आले आहेत. त्यांना त्यांच्या जिल्ह्यात सोडण्यासाठीच एसटीची मोफत बस सेवा उपलब्ध राहणार आहे, असा नवीन खुलासा राज्यातील आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुर्नवसन विभागाने खुलासा केला आहे.

मात्र शनिवारी परिवहन मंत्री अनिल परब यांनी लॉकडाऊनमध्ये राज्यातील विविध भागात अडकलेल्या विद्यार्थी, मजुर, नागरिकांना घरी पोहचविण्यासाठी एसटी महामंडळाकडून ११ मे रोजीपासून मोफत बस सुरु करण्याची घोषणा यांनी केली होती. मात्र या घोषणेचा निर्णय एका रात्रीतच बदलण्यात आला आहे. हि घोषणा घोषणाच राहून हवेत विरली. नव्या पत्रकात हा निर्णय बदलल्याने सरकारमधील विविध विभागात समन्वय नसल्याचे दिसून आले आहे. राज्यभरात अडकलेल्या नागरिकांसाठी एसटीची मोफत सेवा मिळणार अशी घोषणा परिवहन मंत्री अनिल परब यांनी  केली होती.  त्यानुसार मुंबई राहणारे विद्यार्थी, मजूर यांनी आगार, बस डेपोकडे वाट धरली होती. आरोग्य प्रमाणपत्र, पोलीस परवानगी मिळविण्यासाठी धावपळ सुरु होती. मात्र रात्रीतूनच निर्णय बदलण्यात आल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. -------------------

राज्यांतर्गत मोफत सेवा नाही

फक्त इतर राज्यातील जे मजूर व इतर नागरिक महाराष्ट्रात विविध अडकलेले असतील त्यांना महाराष्ट्र राज्याच्या घेऊन जाणे व महाराष्ट्रातील रहिवासी असलेले मजूर व इतर व्यक्ती जे इतर राज्यांतून महाराष्ट्राच्या सीमेपर्यत आलेले आहेत. त्यांच्या महाराष्ट्रातील जिल्हापर्यत पोहचविण्याकरिता ही सेवा असणार आहे. याशिवाय कोणत्याही इतर प्रवासाकरिता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस सेवा मोफत उपलब्ध नसणार, असे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुर्नवसन विभागाने म्हटले.  ------------------

एसटी बस हि प्रत्येकाच्या जिव्हाळाची आहे. राज्यांतर्गत मोफत प्रवास करता येणार, त्यामुळे नागरिकांनी गावाकडे जाण्याची तयारी केली होती. मात्र एसटी संदर्भातील निर्णय बदलल्याने राज्यातील नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. हजारो नागरिकांना मूळगावी जायचे आहे. मात्र आता मदत व पुनर्वसन विभागाकडून आलेल्या नव्या पत्रकात हा निर्णय बदलल्याने सरकारमधील समन्वयाचा अभाव असल्याचे दिसून आला. ------------------

परिवहन मंत्री अनिल परब यांची कोणती घोषणा हवेत विरली 

लॉकडाऊनमुळे राज्यभरात अडकलेलय विद्यार्थी, मजुर, पर्यटक, नागरिकांना त्यांच्या घरी सोडण्यासाठी एसटी महामंडळाकडून सोमवारपासून मोफत बस सुरु करण्यात येणार आहे.  मात्र कन्टेन्मेंट झोनमधून कोणालाही प्रवासाची परवानगी नसेल. एका बसमधून २२ प्रवाशांचा प्रवास होणार, यासाठी २२-२२ प्रवाशांचा गट तयार केला. ही मोफत सेवा फक्त तिसऱ्या टप्प्यातील लाॅकडाऊन काळात म्हणजेच १८ मे पर्यंत वापरता येणार आहे, अशी घोषणा परिवहनमंत्री अनिल परब यांनी केली होती.

मात्र समन्वयाच्या अभावामुळे घोषणा हवेत विरली.   ऑनलाईन बुकिंगसाठी एक नवीन वेब पोर्टल विकसित करण्यात येत आहे. या पोर्टल मार्फत अजर्दार एकटा किंवा दोन ते तीन व्यक्तींचा छोटा गट असला तरीही त्याची नोंद करणे सहज शक्य होणार आहे. एसटीच्या माध्यमातून कोरोनाचा प्रार्दुभाव होऊ नये, यासाठी काही अटी आणि शर्तींसह परवानगी देण्यात येईल. प्रत्येकाला परवानगी घेऊनच प्रवास करायचा आहे. त्यापूर्वी त्यांची थर्मल स्क्रीनिंग, तपासणी संपूर्ण परवानगी दिली जाणार आहे. प्रत्येक एसटी बसमध्ये फिजिकल डिस्टनिगचे पालन कऱण्यात येणार आहे. प्रत्येक बसेसमध्ये फक्त २२ प्रवाशांना नागमोडी पद्धतीने बसविण्यात येणार आहे.

बसमधून प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशांना मास्क घालणे बंधनकारक आहे. बसला सॅनिटाझन केले जाणार आहे. प्रत्येक बस प्रवास सुरु होण्याआधी आणि प्रवासानंतर निर्जंतुक केले जाणार आहे. ज्या जिल्हात प्रवाशांना उतरविण्यांत येईल. त्या जिल्ह्यातील नोडल अधिकारी प्रवाशांची काळजी घेईल. आवश्यकता वाटल्यास वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे आहे, परब यांनी स्पष्ट केले होते. -------------------------------------

 

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना वायरस बातम्यामुंबई