- सचिन लुंगसेमुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मिठी नदीच्या स्वच्छतेसाठी हाती घेतलेला पथदर्शी प्रकल्प कौतुकास्पद असून, या प्रकल्पाच्या निमित्ताने नक्कीच मुंबईची मिठी नदी साफ, सुंदर आणि स्वच्छ होण्यास हातभार लागेल.मात्र हे झाले प्रशासनाच्या वतीने; प्रशासन त्यांचे काम करतच राहील. परंतु, आपण म्हणजे मुंबईकरांनीदेखील पर्यावरण संवर्धनासाठी एक पाऊल पुढे टाकत मिठी नदीच्या स्वच्छतेसाठी कचरा कमी करत हातभार लावावा, असे आवाहन मुंबईच्या विविध प्रश्नांवर काम करत असलेले अभ्यासक बिलाल खान यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत मुंबईकरांना केले.मिठी नदीत जलवाहतूक शक्य आहे?आजच्या क्षणाला आपण मिठी नदीतल्या जलवाहतुकीकडेदेखील पाहिले पाहिजे. मनात आणले आणि करायचे झाले तर आपण मिठी नदीमध्ये जलवाहतूकदेखील राबवू शकतो. मात्र मिठी नदीमधील जलवाहतुकीबाबत कोणीच बोलत नाही. जलवाहतूक सुरु केली तर प्रदूषणाचा निम्मा प्रश्न सुटेल. निम्माच कशाला पूर्ण प्रदूषण कमी होईल. जलवाहतुकीचादेखील विचार केला पाहिजे. सौंदर्यीकरणात याचाही समावेश केला पाहिजे.रासायनिक प्रदूषणाबाबत काय सांगाल?कचरा मिठी नदीमध्ये वाहून येण्याची, कचरा साचण्याची कारणे शोधली पाहिजेत. यावर उपाय शोधला पाहिजे. हे केले नाही तर जेथून मिठी नदीमध्ये कचरा टाकला जातो तो टाकलाच जाईल आणि मिठी नदीमध्ये वाहून येतच राहील. मिठी नदीमध्ये केवळ कचरा नाही तर रासायनिक प्रदूषणदेखील आहे. आपण प्लास्टिक रिसायकल करू शकतो. मेटल रिसायकल करू शकतो. मात्र, मिठी नदीत वाहून येणाऱ्या केमिकलचे काय करणार? गटाराचे पाणी वाहून येते. शौचालयाचा मलजल वाहून येतो. याचे आपण रिसायकल करत आहोत का? आपण जर का हे नाही केले तर पाणी घाणच राहील.मिठी नदी स्वच्छ होईल?मिठी नदी स्वच्छ करण्यासाठीची ही संकल्पना फार उत्तम आहे. हे चुकीचे आहे, असे म्हणू नये आणि म्हणणारदेखील नाही. याचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. सगळ्यात महत्त्वाचे आपण प्रदूषणाचे स्रोत शोधले पाहिजेत. कचरा कमी करण्यासाठीची पावले उचलली पाहिजेत. पाण्यात कचरा येणारच नाही, याची काळजी घेतली पाहिजे. हे केले तर अनेक अडचणी कमी होतील. प्रदूषण होणार नाही, याचीच काळजी घेतली पाहिजे. बाकी मिठी नदी स्वच्छ करण्याचा निर्णय उत्तम आहे.पर्यावरण संवर्धनाला हातभार लागेल?मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने हाती घेतलेल्या प्रकल्पांतर्गत मिठी स्वच्छ होत असेल, कचरा वेगळा होत असेल, त्यावर प्रक्रिया होत असेल, याद्वारे स्थानिकांना रोजगार मिळत असेल तर नक्कीच हा प्रकल्प चांगला आहे. याद्वारे मिठी नदीमधील कचरा कमी होईल आणि पर्यावरण संवर्धनाला हातभार लागेल. मिठी नदीतून गोळा केल्या जाणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया होणार असेल, तो कचरा वेगळा होणार असेल, त्याचा पुनर्वापर होणार असेल तर नक्कीच फायदा होईल. प्रदूषण कमी होईल की नाही? हे आता सांगणे अवघड आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी जेथे कचरा टाकला जातो म्हणजे जेथून कचऱ्याचा उगम होतो तिकडे काम केले पाहिजे.प्रकल्पाला यश येईल?मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अनेक प्रकल्प हाती घेते. मात्र, प्रत्येक प्रकल्पाला यश येतेच, असे नाही. उदाहरण म्हणून बीकेसीमधील सायकल ट्रॅकचा फज्जा उडाला होता. त्यामुळे प्रत्येक प्रकल्प अपयशी होईल, असे नाही. काही अडथळे येतील. मात्र मिठी नदीचे सौंदर्यीकरण करताना केवळ बीकेसी डोळ्यासमोर ठेवता कामा नये. मिठीच्या उर्वरित ठिकाणीदेखील अशा घटकांना प्राधान्य दिले पाहिजे.
मिठी नदीत जलवाहतूक शक्य; नदीही नक्कीच स्वच्छ होईल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2021 8:54 AM