Join us  

परिवहनला व्यवस्थापक नाही

By admin | Published: May 24, 2014 1:41 AM

तोट्यात सुरू असलेल्या महापालिका परिवहन उपक्रमास मार्च महिन्यापासून व्यवस्थापकच नाहीत.

नामदेव मोरे, नवी मुंबई - तोट्यात सुरू असलेल्या महापालिका परिवहन उपक्रमास मार्च महिन्यापासून व्यवस्थापकच नाहीत. कार्यकारी अभियंता व्यवस्थापकाचे काम पहात आहेत. यामुळे चालकाशिवाय परिवहनचा कारभार सुरू असून त्याचा परिणाम कामकाजावर होत आहे. नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाविषयी समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. येथील सभापतीपद वारंवार बदलले जात आहे. उपक्रमाचा तोटा वाढत आहे. नागरिकांना चांगली व वेळेत सेवा देण्यास अपयश येवू लागले आहे. उपक्रमाची घडी बसविण्यासाठी चांगल्या व्यवस्थापकाची गरज आहे. परंतु येथील व्यवस्थापक पदावर असलेल्या जी. सी. मांगले यांची मार्चमध्ये बदली झाली आहे. त्या जागेवर शासनाकडून चांगल्या अधिकार्‍याची नियुक्ती होणे आवश्यक होते.परंतु जवळपास तीन महिने होत आल्यानंतरही अद्याप सदर पद भरण्यात आलेले नाही. उपक्रमाने कार्यकारी अभियंता शिरीष आरदवाड यांच्याकडे परिवहन व्यवस्थापक पदाचा कार्यभार दिला आहे. यांत्रिकी विभागातील अधिकार्‍याकडे किती दिवस हे पद राहणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दैनंदिन कामकाज चांगले होत असले तरी धोरणात्मक निर्णय घेण्यास तितकाच सक्षम अधिकारी असणे आवश्यक आहे. सक्षम अधिकारी नसल्यामुळे उपक्रमाचा गाडा सुरळीत करण्यास अडचणी येवू शकतात. भाडेवाढीच्या विषयावरून हे स्पष्ट झाले आहे. तोटा भरून काढण्यासाठी भाडेवाढ आवश्यक असल्याचे वर्षभर सत्ताधारी राष्ट्रवादी काँगे्रस व प्रशासन सांगत होते. परिवहन प्राधिकरणाने भाडेवाढ दिल्यानंतर मात्र त्याची अंमलबजावणी थांबविण्यात आली आहे. वास्तविक हा निर्णय विचार करून घेता आला असता. परंतु पहिल्यांदा भाडेवाढ घोषित केली. प्रसिद्धिमाध्यमांना माहितीही देण्यात आली व एक तासात पुन्हा निर्णय बदलण्यात आला. प्रशासन व सभापतींमध्ये ठोस भूमिका व ताळमेळ दिसला नाही. भविष्यातही असे प्रकार थांबविण्यासाठी सक्षम अधिकारी लवकरात लवकर नेमणे आवश्यक आहे. याविषयी माहिती घेण्यासाठी सभापती मुकेश गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की सद्यस्थितीमध्ये आरदवाड हे चांगले काम करत आहेत. भविष्यात परिवहन व्यवस्थापकाचे पद लवकर भरावे यासाठी आम्ही पाठपुरावा करणार असल्याचे स्पष्ट केले.