मुंबईत आता वाहतूक हा वायू प्रदूषणाचा सर्वात मोठा स्त्रोत; जीवघेणे सूक्ष्मकण ५ वर्षांत दुप्पट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2021 01:19 PM2021-06-29T13:19:30+5:302021-06-29T13:20:02+5:30

दिल्ली, मुंबई, पुणे यासारख्या महानगरांमध्ये गेल्या दशकभरात वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे.

Transport is now the biggest source of air pollution in Mumbai; Succeeding microbes double in 5 years | मुंबईत आता वाहतूक हा वायू प्रदूषणाचा सर्वात मोठा स्त्रोत; जीवघेणे सूक्ष्मकण ५ वर्षांत दुप्पट

मुंबईत आता वाहतूक हा वायू प्रदूषणाचा सर्वात मोठा स्त्रोत; जीवघेणे सूक्ष्मकण ५ वर्षांत दुप्पट

Next

- सचिन लुंगसे

मुंबई : हवेत जीवघेणे सूक्ष्मकण सोडण्याचे वाहतूक क्षेत्राचे प्रमाण गेल्या पाच वर्षांत दु्प्पट झाले आहे. सफरच्या माहितीनुसार २०१९ - २० मध्ये पीएम २.५ कणांच्या उत्सर्जनात ३०.५ टक्के वाहतूक, १८ टक्के उद्योग आणि वीज क्षेत्र, १५ टक्के घरगुती ज्वलन असा वेगवेगळ्या क्षेत्रांचा वाटा असून, यात स्वयंपाक, कचरा जाळणे, गोवऱ्या जाळणे, रस्त्यावरील विक्रेत्यांकडून होणारे व लाकूड जाळणे यांचा समावेश आहे. 
 
दिल्ली, मुंबई, पुणे यासारख्या महानगरांमध्ये गेल्या दशकभरात वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. मात्र दिल्लीतील सार्वजनिक व खासगी वाहतुकीने कॉम्प्रेस्ट नॅचरल गॅस (सीएनजी) चा अंगीकार मोठ्या प्रमाणावर केलेला असताना मुंबईत त्याचे प्रमाण खूप कमी आहे. वाहने पेट्रोल आणि डिझेलवरच चालत आहेत. मुंबईची हवा पीएम २.५ च्या माध्यमातून प्रदूषित करणारे इतर घटक आहेत.

वाऱ्याने उडवलेली धूळ (१५ टक्के), महापालिकेचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, शवदहन, विमान वाहतूक, उदबत्ती, वीटभट्टी आदींचा समावेश असलेले इतर घटक (२१.५ टक्के) आहेत. तर हवेत वेगवेगळ्या आकाराचे सूक्ष्म कण असतात. धूळ, परागकण, काजळी, धूर यांचे मिश्रण असलेले कण हानिकारक असतात. पीएम २.५ या छोट्या कणांचा व्यास २.५ मायक्रोमीटरहून कमी असतो. हे कण अनेक दिवस हवेत तरंगू शकत असल्याने, फुप्फुसात प्रवेश करू शकण्याइतके सूक्ष्म असल्यामुळे आरोग्यावर रिणाम होऊ शकतात. 

२०१९ - २०
पुणे येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मटेरिऑलॉजी (आयआयटीएम) अंतर्गत सिस्टम ऑफ एअर क्वालिटी वेदर फोरकास्टींग अँड रिसर्च (सफर) द्वारे पीएम २.५ या प्रदूषक घटकाच्या स्त्रोताच्या अंदाजपत्रकाचे २०१९ - २० या वर्षासाठी विश्लेषण करण्यात आले. त्यानुसार पीएम २.५ च्या उत्सर्जनात २०१६ - १७ या वर्षात १६ टक्के असलेला वाहतूक क्षेत्राचा वाटा ३०.५ टक्क्यांवर गेला आहे.

२०१६ - १७ 
सफरकडून अशाच प्रकारच्या पीएम २.५ उत्सर्जन स्त्रोतांच्या २०१६ - १७ या वर्षात करण्यात आलेल्या अंदाजपत्रकात वाहतूक क्षेत्राचा १६ टक्के वाटा होता. उद्योग आणि वीज क्षेत्राचा वाटा त्यावेळी सर्वाधिक ३६ टक्के होता. इतर क्षेत्रांपैकी घरगुती ज्वलन २७ टक्के आणि वाऱ्याने उडवलेली धूळ २१ टक्के असा वाटा होता.

पीएम २.५ च्या उत्सर्जनामध्ये गेल्या पाच वर्षांत वाहतूक क्षेत्रामुळे वाढ झाली आहे. वाहनांची वाढलेली संख्या आणि सिग्नलवर वारंवार होणारी वाहतूक कोंडी या दोन्हींचा हा एकत्रित परिणाम आहे.
- डॉ. गुफरान बेग, संस्थापक, सिस्टम ऑफ एअर क्वालिटी वेदर फोरकास्टींग अँड रिसर्च (सफर)   

नवीन उद्योग किंवा वीजनिर्मिती केंद्रे आलेली नाहीत. वाहनांतून होणारे प्रदूषण वाढत आहे. खासगी वाहनांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी मेट्रो आणि रेल्वे यामध्ये सुधार करणे शहराला जमलेले नाही.
- अनुमिता रॉय चौधरी, सेंटर फॉर सायन्स अँड एनव्हार्यनमेंट संशोधन, संचालिका 
 
मुंबईच्या कृती कार्यक्रमाचा भाग असलेला व स्त्रोतांचे मूल्यमापन मोठ्या पातळीवर करणारा एक वेगळा अभ्यास प्रकल्प नॅशनल एनव्हार्यनमेंटल इंजिनिअरींग रिसर्च इन्स्टिट्यूट (नीरी) मार्फत सुरू आहे. हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी महत्त्वाच्या मुद्यांवर लक्ष्य केंद्रीत करण्यासाठी दोन्हींची तुलना करू. 
- सुधीर श्रीवास्तव, माजी अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

पेट्रोल व डिझेलवर चालणाऱ्या वाहनांमधून होणाऱ्या उत्सर्जनात अत्यंत अपायकारक सूक्ष्मकण असतात जे श्वसन संस्थेच्या वरच्या, मधल्या आणि खालच्या भागाला म्हणजेच नाक, घसा आणि फुप्फुसाला इजा पोहचवतात.
- डॉ. संजीव मेहता, श्वसनरोग तज्ज्ञ

महाराष्ट्र परिवहन विभागाच्या म्हणण्यानुसार

 - मुंबईने वर्षाच्या सुरवातीलाच ४० लाख वाहनांची संख्या ओलांडली आहे.
- त्यामध्ये ११.६ लाख कार
- २४ लाख दुचाकी
- २०१६-१७ मध्ये वाहनांची एकूण संख्या ३०.६९ लाख
- २०११-१२ साली २०.२८ लाख

२०२०-२१ च्या आर्थिक पाहणी अहवालानुसार 

- मुंबईत राज्याच्या एकूण संख्येपैकी १०.३ टक्के वाहनांची नोंद
- मुंबईत वाहनांची घनता २००० प्रति किलोमीटर 

काय आहेत उपाय

- जुनी, विशेषतः व्यावसायिक वाहने वापरातून बाद करा. 
- नवीन वाहनांना प्रोत्साहन देण्याचे धोरण स्वीकारा.
- दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहनांचे विद्युतीकरण कार्यक्रमाव्यतिरिक्त शहरकेंद्री धोरण राबवा. 
- रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाच्या मदतीने रस्त्यावरील उत्सर्जनावर नियंत्रण ठेवा.
- पादचारी आणि सायकलस्वारांसाठी पायाभूत सुविधा द्या.

Web Title: Transport is now the biggest source of air pollution in Mumbai; Succeeding microbes double in 5 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.