पार्किंग धोरणाविरोधात वाहतूक संघटनांनी एकत्र येऊन लढा द्यावा!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 01:24 AM2019-07-15T01:24:33+5:302019-07-15T01:25:08+5:30
सार्वजनिक वाहनतळापासून ५०० मीटरच्या आत पार्किंग करण्यात येणाऱ्या वाहनांवर पालिकेकडून कारवाई करण्यात येत आहे.
मुंबई : सार्वजनिक वाहनतळापासून ५०० मीटरच्या आत पार्किंग करण्यात येणाऱ्या वाहनांवर पालिकेकडून कारवाई करण्यात येत आहे. याविरोधात सर्व वाहतूकदार संघटनांनी संघटित होऊन लढा देण्याची गरज आहे, असे आवाहन नवभारतीय शिववाहतूक संघटनेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष शरीफ देशमुख यांनी केले आहे.
देशमुख यांनी सांगितले की, मुंबईत दररोज शेकडो वाहनांची भर पडत आहे़ आता ही संख्या ३३ लाख ५२ हजारांवर गेली आहे. पालिकेने सार्वजनिक वाहनतळापासून ५०० मीटर अंतराच्या आत पार्किंग केल्यास ७ जुलैपासून दंड वसूल करण्याचा निर्णय घेतला़ यामध्ये ट्रक, बससारख्या अवजड वाहनांना टोइंग शुल्क ५ हजार, दंड दहा हजार, विलंब केल्यास किमान ११ हजार दंड निश्चित केला आहे. यामध्ये मोठ्या वाहनांना किमान १५ तर कमाल २३,२५० रुपये दंड वसूल केला जाऊ शकतो. बेकायदा पार्किंग केलेले वाहन टोइंग केल्यानंतर मालकी हक्काचा दावा मालकाकडून सांगण्यात येईपर्यंत प्रतिदिन विलंब आकारणी लावली जाणार आहे. संबंधित वाहन जर मालकाने ३० दिवसांच्या आत सोडवून नेले नाही तर ते बेवारस समजून त्याची लिलावात विक्री करण्यात येणार आहे. पालिकेच्या या कठोर निर्णयाविरोधात सर्वच स्तरांतून आवाज उठणे गरजेचे आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
वाहतूककोंडीला अनेक कारणे आहेत़ काही ठिकाणी मेट्रोची कामे सुरू आहेत, काही ठिकाणी पुलाचे काम रखडलेले आहे, रस्त्यांवर खड्डे आहेत़ त्यामुळे एकंदरीत विचार करता, अनधिकृत पार्किंगच्या कारवाईचे परिणाम प्रत्यक्ष येण्यास अजून काही महिन्यांचा कालावधी लागेल, असे एका वाहतूक अधिकाºयाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले़
>३३४ वाहनांवर कारवाई, १३ लाखांचा दंड वसूल
अनधिकृत पार्किंग विरोधातील पहिल्या टप्प्यातील कारवाई दरम्यान दि. १० जुलै २०१९ पर्यंत ३३४ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये १६८ चार चाकी, ११ तीन चाकी व १५५ दुचाकी वाहनांचा समावेश आहे. या कारवाईपोटी ७ ते १० जुलै या कालावधीत १३ लाख ९६ हजार १५० एवढी दंड वसुली करण्यात आली आहे.
>मुंबई महापालिकेने वाहनतळाच्या परिसरातील ५०० मीटरच्य्या आत पार्किंग करणाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे वाहनतळाच्या परिसरातील रस्ते रिकामे झाले असून त्या भागातील वाहतूक सुधारण्यास मदत झाली आहे.
- शहाजी उमाप, उपायुक्त, वाहतूक विभाग