Join us  

वाहतूक पोलिसांचा ‘आवाज’ वाढला

By admin | Published: May 07, 2016 12:59 AM

वाहतूककोंडी टाळण्यासाठी लोकांना शिस्त लागावी, म्हणून हाती दोरखंड घेऊन उभे राहणाऱ्या भायखळा वाहतूक पोलिसांनी निराळी शक्कल लढवली आहे. दोरखंडाआडून किंवा खालून रस्त्यावर

मुंबई : वाहतूककोंडी टाळण्यासाठी लोकांना शिस्त लागावी, म्हणून हाती दोरखंड घेऊन उभे राहणाऱ्या भायखळा वाहतूक पोलिसांनी निराळी शक्कल लढवली आहे. दोरखंडाआडून किंवा खालून रस्त्यावर येऊ पाहणाऱ्या प्रवाशांना मायक्रो मेगाफोनच्या मदतीने शिस्त लावण्याचे काम वाहतूक पोलीस करीत आहे.या अनोख्या उपक्रमाबाबत माहिती देताना भायखळा वाहतूक पोलीस वरिष्ठ निरीक्षक विश्वास तांबे म्हणाले की, सह पोलीस आयुक्त (वाहतूक) मिलिंद भारांबे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना विभागात नव-नवीन लोकोपयोगी उपक्रम राबवण्याचे आवाहन केले होते. भायखळा रेल्वे स्थानकातून पूर्वेकडे बाहेर पडणारे प्रवासी पॅलेस जंक्शन येथील वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरत होते. परिणामी रेल्वे स्थानकातून थेट रस्त्यावर येणाऱ्या प्रवाशांना सिग्नल लागेपर्यंत रोखण्यासाठी दोरखंडाचा वापर सुरू केला होता. दोरखंडाच्या वापरामुळे वाहतुकीस अडथळा होणाऱ्या नागरिकांना रोखण्यात पोलीस बऱ्यापैकी यशस्वी झाले होते. मात्र काही प्रवासी दोरखंडाखालून आणि दोरखंडाच्या बाजूने रस्त्यावर येण्याचा प्रयत्न करायचे. त्यांना दोरखंडामागे राहण्यासाठी वाहतूक पोलिसांना मोठ्याने ओरडावे लागत होते. मात्र वाहतुकीच्या आवाजात पोलिसांचा आवाज बऱ्याचवेळा प्रवाशांच्या कानापर्यंत जायचाच नाही. त्यामुळे अशा प्रवाशांना रस्त्याशेजारी रोखण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. याबाबत अतिरिक्त पोलीस आयुक्त सुनील पारस्कर आणि पोलीस उपायुक्त (शहरे) अनिल कुंभारे यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर मेगा मायक्रोफोनचा वापर करण्याचा मार्ग निघाला. (प्रतिनिधी)