किसान रेल्वेची दोन लाख टन फळे, भाज्यांची वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:06 AM2021-09-21T04:06:37+5:302021-09-21T04:06:37+5:30
मुंबई : मध्य रेल्वेने १९ सप्टेंबर २०२१ रोजी सांगोला ते मुजफ्फरपूरपर्यंत आपली ६०० वी किसान रेल चालवली. मध्य रेल्वेने ...
मुंबई : मध्य रेल्वेने १९ सप्टेंबर २०२१ रोजी सांगोला ते मुजफ्फरपूरपर्यंत आपली ६०० वी किसान रेल चालवली. मध्य रेल्वेने आपली ६०० वी फेरी पूर्ण करत किसान रेल्वे शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी पुढे नेणारा सर्वात यशस्वी उपक्रम ठरला आहे. किसान रेलमधून संपूर्ण भारतात २.०८ लाख टन फळे आणि भाज्यांची वाहतूक केली. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी किसान ६०० फेऱ्या यशस्वीपणे चालविण्याऱ्या मध्य रेल्वे कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.
किसान रेल्वेमुळे जलद वाहतूक, शून्य अपव्यय, ५० टक्के अनुदानासह शेती उत्पादनांसाठी मोठ्या आणि नवीन बाजारपेठांमध्ये निश्चित मिळाला. तसेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये समृद्धी, आनंद आणि नवीन आशा आणली. ७ ऑगस्ट २०२० रोजी पहिली किसान रेल्वे सुरू झाल्यापासून मध्य रेल्वेकडून किसान रेल्वेच्या ६०० फेऱ्यांमध्ये २,०८,३७८ टन नाशवंत वस्तूंची वाहतूक करण्यात आली. मध्य रेल्वेला ७ ऑगस्ट २०२० रोजी पहिली किसान रेल्वे आणि २८ डिसेंबर रोजी किसान रेल्वेची १००वी फेरी चालवण्याचा गौरव प्राप्त झाला. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेबलिंकद्वारे १०० व्या किसान रेलला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. किसान रेल्वेची ५०० वी फेरी १२ ऑगस्ट २०२१ रोजी चालविण्यात आली. आता किसान रेल्वेची ६०० वी फेरी १९ सप्टेंबर रोजी सांगोला येथून मुझफ्फरपूरकरिता रवाना झाली.
सोलापूर भागातून डाळिंब, द्राक्षे, लिंबू, शिमला मिरची, लातूर आणि उस्मानाबाद भागातून फुले, नाशिक भागातून कांदा, भुसावळ व जळगाव भागातून केळी, नागपूर भागातून संत्री व इतर फळे आणि भाज्या दिल्ली, बिहार, पश्चिम बंगालसारख्या दूरच्या बाजारपेठांमध्ये लवकर पोहोचतात. किसान रेल्वेद्वारे शेतकऱ्यांच्या उत्पादनाला मोठ्या बाजारपेठांसह चांगले उत्पन्न मिळते, त्यांच्या मालाला चांगली किंमत, जलद वाहतूक, कमीत कमी अपव्यय यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात शेतीपूरक अनुकूल बदल झाला आहे. किसान रेल्वे ग्रामीण महाराष्ट्रातील लोकांसाठी समृद्धीचे आणि भरभराटीचे साधन बनले आहे.
सरकारने ‘ऑपरेशन ग्रीन - टॉप टू टोटल’ या आत्मनिर्भर भारत अभियानाच्या अंतर्गत सरकारच्या धोरणाचा एक भाग म्हणून शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानही वाढवले आहे. यामुळे रेल्वे शेतकऱ्यांच्या वाहतुकीसाठी पहिली पसंती बनली आहे. मध्य रेल्वे सध्या देवळाली - मुजफ्फरपूर, सांगोला - मुझफ्फरपूर, सांगोला - आदर्शनगर, दिल्ली, सांगोला - शालीमार, रावेर - आदर्शनगर दिल्ली आणि सावदा - आदर्शनगर दिल्ली अशा ६ किसान रेल्वे चालवत आहे.