४७.५५ कोटी लसींची हवाई मार्गाने वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:09 AM2021-08-25T04:09:18+5:302021-08-25T04:09:18+5:30
मुंबई : वैद्यकीय साहित्याची जलद वाहतूक करून आरोग्य क्षेत्राला बळ देणाऱ्या हवाई वाहतूक क्षेत्राने लस वहनातही आपल्या मदतकार्याचा ठसा ...
मुंबई : वैद्यकीय साहित्याची जलद वाहतूक करून आरोग्य क्षेत्राला बळ देणाऱ्या हवाई वाहतूक क्षेत्राने लस वहनातही आपल्या मदतकार्याचा ठसा उमटविला आहे. विविध विमान कंपन्यांच्या माध्यमातून आतापर्यंत ४७ कोटी ५५ लाख लसकुप्यांची (डोस) वाहतूक करण्यात आली आहे.
हवाई वाहतूक मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, कोरोना प्रादुर्भावाच्या काळात वैद्यकीय साहित्याच्या वाहतुकीला सर्वोच्च प्राधान्य देत आरोग्य सुविधांच्या तुटवड्यावर मात करण्यात आली. शिवाय आतापर्यंत जवळपास ४७ कोटी ५५ लाख लसकुप्या देश-विदेशातील ६० ठिकाणी पोहोचवण्यात हवाई वाहतूक क्षेत्राने मोलाची भूमिका बजावली. त्यासाठी ४ हजार १५९ विमानांचा वापर करण्यात आला.
रविवारी रक्षाबंधनाच्या दिवशी तब्बल ४६ लाख २ हजार लसकुप्या देशभरातील २६ ठिकाणी पोहोचवण्यात आल्या. त्यासाठी २० विमानांचा वापर करण्यात आल्याची माहितीही देण्यात आली.