Join us

मेट्रो प्रकल्पामुळे वाहतूककोंडी वाढली

By admin | Published: December 30, 2016 3:51 AM

मुंबईच्या उपनगर जिल्ह्यातील पश्चिम उपनगरात एमएमआरडीएने दहिसर पश्चिम ते डी.एन. नगर, अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व या मेट्रो मार्गाचे काम हाती घेतले आहे.

- टीम लोकमत, मुंबई

मुंबईच्या उपनगर जिल्ह्यातील पश्चिम उपनगरात एमएमआरडीएने दहिसर पश्चिम ते डी.एन. नगर, अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व या मेट्रो मार्गाचे काम हाती घेतले आहे. या कामांसाठी रस्त्यांवर ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत, तर पूर्व उपनगरात लाल बहादूर शास्त्री मार्गावर ठिकठिकाणी भूमिगत जलवाहिन्यांच्या कामांसाठी रस्ते खोदण्यात आले आहेत. परिणामी, या कामांमुळे रस्ते अरुंद झाले असून, वाहनचालकांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. विशेषत: उपनगरातील मुख्य मार्गावरून इच्छित स्थळ गाठण्यासाठी दुप्पट वेळ वाहनचालकांना खर्ची घालावा लागत असून, ही कामे पूर्ण होईपर्यंत तरी मुंबईकरांची वाहतूककोंडीतून सुटका होणार नाही.मुंबईकर रेल्वेने चर्चगेट ते बोरीवली हे अंतर सुमारे एका तासात पार करतात, परंतु या मार्गावर ठिकठिकाणी होणाऱ्या वाहतूककोंडीमुळे वाहनांनी हे अंतर कापायला किमान दोन ते अडीच तास लागतात. त्यातच पश्चिम उपनगरात मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने मेट्रो प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. मात्र, या मेट्रोच्या कामासाठी पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि आणि डी.एन. नगर ते दहिसर (प.) लिंक रोड या मार्गावर ठिकठिकाणी टाकण्यात आलेल्या बॅरिकेड्समुळे या दोन्ही मार्गांवर वाहतूककोंडी होत आहे. वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर हा पहिला मेट्रो मार्ग पूर्ण होण्यास आठ वर्षे लागली. परिणामी, पश्चिम उपनगरातील मेट्रो प्रकल्प पूर्ण होण्यास अधिक कालावधी लागण्याची शक्यता आहे. या कारणास्तव पश्चिम उपनगरातील नागरिकांना प्रकल्पाचे स्ट्रक्चर उभे राहीपर्यंत वाहतूककोंडीला सामोरे जावे लागणार आहे. गोरेगाव (पूर्व) आणि पश्चिम मार्गाला जोडणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलावर एमटीएनएल जंक्शनवर बांधण्यात येणाऱ्या नव्या उड्डाणपुलाच्या कामामुळे नागरिकांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे.कमानी जंक्शन, लाल बहादूर शास्त्री मार्ग, कुर्लालाल बहादूर शास्त्री मार्गावर कमानी जंक्शन येथे महापालिकेने भूमिगत जलवाहिनीचे काम हाती घेतले आहे. या कामासाठी कमानी सिग्नल येथून मायकल शाळेपर्यंतचा रस्ता खणण्यात आला. त्यामुळे सकाळी आणि सायंकाळी वाहनचालकांना येथे १५ मिनिटांहून अधिक काळ खर्ची घालावा लागत आहे.कुर्ला डेपो, लाल बहादूर शास्त्री मार्ग, कुर्लाकुर्ला डेपो येथील सीएसटीकडील रस्त्यावरही महापालिकेने भूमिगत जलवाहिनीचे काम हाती घेतल्याने वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.सर्वोदय रुग्णालय, लाल बहादूर शास्त्री मार्ग, घाटकोपरघाटकोपर पश्चिमेकडील सर्वोदय रुग्णालयालगत गोळीबार रोडवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, महापालिकेने रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले आहे. परिणामी, खड्ड्यांतून हा रस्ता कापताना चालकांना कोंडीला सामोरे जावे लागते.लाल बहादूर शास्त्री मार्ग, मुलुंड आणि भांडुपमुलुंड ते घाटकोपर दरम्यानच्या लाल बहादूर शास्त्री मार्गावर मुलुंड येथील संतोषी माता मंदिर परिसरात, जलवाहिनीच्या कामासाठी रस्ता खोदण्यात आला आहे. मार्गावरील भांडुपमधील जैन मंदिर, ड्रीम मॉल, मंगतराम पेट्रोल पंप येथेही रस्ता रुंदीकरणाचे काम मागील दोन महिन्यांपासून सुरू आहे. घाटकोपर येथील गोपाल भवन परिसरातही जलवाहिनीच्या कामासाठी रस्ता खोदण्यात आला आहे. परिणामी, रस्त्यांची रुंदी कमी झाली आहे. या कारणास्तव लाल बहादूर शास्त्री मार्गावर ठिकठिकाणी वाहनचालकांना १५ मिनिटांच्या प्रवासासाठी अर्धा तास खर्ची घालावा लागत आहे.साकीनाका, अंधेरीअंधेरी पूर्व आणि पश्चिमेला वर्षाच्या बारमाही रस्त्यांची खोदकामे सुरू असतात. परिणामी, येथील वाहनांच्या संख्येत दिवसागणिक भरच पडत असते. सकाळी आणि सायंकाळी अंधेरी पूर्वेसह पश्चिमेला मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत असून, अंधेरी पश्चिमेकडील साकीनाका जंक्शनवर वाहनचालकांना सर्वाधिक वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो.महापालिकेकडून रस्त्यांची, एमएमआरसीकडून मेट्रो-३ तर एमएमआरडीएकडून मेट्रो-७ची कामे सुरू आहेत. या कामांमुळे भविष्यात चांगला फायदा होईल, हे मात्र नक्की, परंतु सुरू असलेल्या कामांमुळे वाहतूककोंडीचा वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागतो. वाहतूककोंडी होऊ नये, यासाठी वाहतूक पोलिसांचे जादा मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे. ज्या विभागांची कामे सुरू आहेत, त्यांच्याकडून स्वयंसेवकही देण्यात येतील. पालिकेकडून २७५, तर मेट्रोच्या कामांसाठी एमएमआरसी व एमएमआरडीएकडून ८00 स्वयंसेवक देणार आहेत. मेट्रोची कामे साधारणपणे पाच वर्षे सुरू राहातील व या दरम्यान अवजड वाहनांना सध्या नव्याने आखून दिलेल्या नियमानुसार प्रवेशबंदी असेल. - मिलिंद भारंबे (सहपोलीस आयुक्त, वाहतूक)