लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाण्यातील माजिवडा चौकातील उड्डाणपुलावरील घोडबंदरहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर कंटेनर उलटल्याने अगोदरच वाहतूक विस्कळीत झालेली असताना, नजीकच्या परिसरात आणखी चार वाहने बंद पडल्याने, घोडबंदर रोडवरील वाहतूकव्यवस्था सोमवारी पार कोलमडली. ऐन सकाळच्या वेळी वाहनांची भली मोठी रांग लागल्याने नोकरदारवर्गाचे हाल झाले. ठाणे येथील माजिवडा चौकातील उड्डाणपुलावरून सोमवारी सकाळी विद्युततारांचे तीन मोठे बंडल घेऊन भिवंडीच्या दिशेने एक कंटेनर निघाला होता. उड्डाणपुलावरील घोडबंदर-मुंबई मार्गिकेवरील एका वळणावर कंटेनर उलटला. या अपघातात कुणीही जखमी झाले नाही. या अपघातामुळे वाहतूक पोलिसांनी उड्डाणपुलावरील घोडबंदर-मुंबई मार्गिकेवरील वाहतूक बंद केली होती. उड्डाणपुलाखाली असलेल्या मार्गावरून वाहनांची वाहतूक सुरू होती. या मार्गावर घोडबंदर, तसेच बाळकुम-भिवंडीमार्गे येणाऱ्या वाहनांचा भार वाढल्याने वाहतूक संथगतीने सुरू होती. अशातच पोखरण रस्ता क्रमांक-२ वरून कापूरबावडीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाळूचा ट्रक बंद पडला. भरीस भर तत्त्वज्ञान विद्यापीठाजवळ मिरा-भार्इंदर महापालिका परिवहनसेवेची बस, कापूरबावडीहून माजिवड्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर पाण्याचा टँकर, तर याच भागात टीएमटीची बस अर्ध्या तासाच्या फरकाने बंद पडली. उड्डाणपुलावरील वाहतूक बंद, तर पुलाखाली असलेल्या मार्गावर एकाच वेळी चार वाहने बंद पडल्याने या भागातील वाहतूकव्यवस्था पार कोलमडली. ऐन सकाळच्या वेळी हा प्रकार घडल्याने कामावर निघालेल्या नोकरदारवर्गाला वाहतूककोंडीचा सामना करावा लागला. पुलावर उलटलेला कंटेनर बाजूला काढण्यात वाहतूक पोलिसांना चार तास लागले. त्यानंतर, या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. कंटेनर उलटण्याच्या काही तास आधी त्याच ठिकाणी दुसरा कंटेनर बंद पडला होता. तो वाहतूक पोलिसांनी तत्काळ बाजूला काढला.
घोडबंदर रोडवर वाहतूककोंडी
By admin | Published: June 20, 2017 2:29 AM