Join us

स्थानकाजवळ कचऱ्याचे ढीग

By admin | Published: April 19, 2017 1:05 AM

कांदिवली पश्चिम येथील बजाज मार्गावर गटारातील कचरा हा याच मार्गाच्या कडेला ठेवण्यात आला आहे.

मुंबई : कांदिवली पश्चिम येथील बजाज मार्गावर गटारातील कचरा हा याच मार्गाच्या कडेला ठेवण्यात आला आहे. हा अत्यंत वर्दळीचा मार्ग असून, बाजूला बस डेपो आणि बजाज हायस्कूल आहे. गटारातील कचरा रस्त्याच्या कडेला असल्याने पदचाऱ्यांनी त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो, शिवाय कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. यामुळे कांदिवली स्थानकाकडे ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांसह नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.पावसाळ्यापूर्वी महापालिकेचे कर्मचारी नालेसफाई करतात. मात्र, हे कर्मचारी नाल्यातील गाळ आणि कचऱ्याची विल्हेवाट लावत नाही. यामुळे स्थानिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिकांना आरोग्याचा प्रश्न भेडसावत आहे. त्यातच या अस्वच्छतेमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. परिणामी, या समस्येवर संबंधित कर्मचाऱ्यांनी कचऱ्याची योग्यरीत्या विल्हेवाट लावावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.महानगरपालिकेने पावसाळ्यापूर्वी नालेसफाईचे काम हाती घेतले, ते योग्य आहे, परंतु नालेसफाईनंतर काढण्यात आलेला गाळ आणि कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. हा गाळ रस्त्यांवर टाकल्याने, रेल्वे स्थानकाकडे ये-जा करणाऱ्या स्थानिकांना याचा त्रास होत आहे. यामुळे महानगरपालिकेने लक्ष देऊन त्वरित गाळ उचलून येथील दुर्गंधी लवकरात लवकर दूर करावी, अशी मागणी कांदिवली येथील नारायण परब यांनी केली आहे. (प्रतिनिधी)