तरंगत्या कचऱ्याच्या सफाईसाठी ‘ट्रॅशबूम’, मिठी नदीसह, पूर्व उपनगरातील नाल्यांसाठी ठरणार उपयुक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2024 12:28 PM2024-02-01T12:28:23+5:302024-02-01T12:29:37+5:30
Mumbai: नदी, नाल्यांमध्ये तरंगणारा कचरा ही पालिकेसमोरील न सुटणारी समस्या आहे. भरतीच्या वेळी समुद्रातून कचरा नाल्यांमध्ये येतो तर नाल्यांमधील कचराही वाहत समुद्राला जाऊन मिळतो.
मुंबई - नदी, नाल्यांमध्ये तरंगणारा कचरा ही पालिकेसमोरील न सुटणारी समस्या आहे. भरतीच्या वेळी समुद्रातून कचरा नाल्यांमध्ये येतो तर नाल्यांमधील कचराही वाहत समुद्राला जाऊन मिळतो. हा कचरा हटवून पाण्याचा निचरा जलदगतीने होण्यासाठी पालिकेकडून ‘ट्रॅश बूम’सह तराफ्याचा वापर केला जातो. सध्या मुंबईत ९ ठिकाणी ही यंत्रणा असून, आणखी १६ ठिकाणी कार्यरत केली जाणार आहे.
मिठी नदीतही ‘ट्रॅश बूम’ची संख्या वाढवण्यात येणार असून, पुढच्या काही आठवड्यात या यंत्रणेसाठी निविदाप्रक्रिया सुरू केली जाणार आहे. पावसाळ्याआधीच निविदा पूर्ण करून ‘ट्रॅश बूम’ टप्याटप्प्याने पालिकेच्या ताफ्यात दाखल होतील.
पालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाच्या माहितीनुसार, शहर आणि उपनगरांतील मोठे नाले, छोटे नाले, मिठी नदी यांची लांबी सुमारे ६८९ किमी आहे.
मोठ्या नाल्यांची लांबी सुमारे २४८ किमी असून, छोट्या नाल्यांची लांबी सुमारे ४२१ किमी आहे.
पाणी वाहण्यास हाेता अडथळा
मिठी नदीची लांबी २० किमी आहे. यात काठावरील वस्त्या, घरातून कचरा नाल्यांमध्ये टाकला जातो. नाल्यात प्लास्टिक, गाद्यांसह भंगारातील अन्य कचरा आढळून येतो. तरंगणाऱ्या या कचऱ्यामुळे पाणी वाहून जाण्यास अडथळा येतो.
हा कचरा काढण्यासाठी व तो समुद्रात जाऊ नये, यासाठी पालिकेने काही वर्षांपूर्वी ‘ट्रॅश बूम’सहित तराफा घेतले आणि त्याचा वापर नदी, नाल्यांमध्ये सुरू केला.
पश्चिम उपनगरातील सहा ठिकाणी आणि मिठी नदीमध्ये तीन हे ‘ट्रॅशमिठी नदीत सध्या ३ ट्रॅश बूम
बूम’ तरंगता कचरा काढण्यासाठी ठेवले आहेत. तराफ्याच्या जाळीत हा कचरा अडकतो आणि तो ‘ट्रॅश बूम’द्वारे काढला जातो.
हा कचरा समुद्रात जाण्यापासून रोखण्यासाठी हरित लवाद, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व न्यायालयानेही पालिकेस आवश्यक उपाय करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे समुद्रात वाहून जाणारा तरंगता कचरा रोखण्यासाठी पालिकेने हा निर्णय घेतला आहे.
पावसाळ्यात ठरणार फायदेशिर
या यंत्रणेचा फायदा लक्षात घेता, आणखी १६ ठिकाणी ‘ट्रॅश बूम’सह तराफा यंत्रणा घेण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील पावसाळ्यासाठीच याचा फायदा होणार असल्याचेही स्पष्ट केले.