ट्रॉमा केअर सेंटर प्रकरण : कूपरच्या अधिष्ठात्यांवर निष्काळजीपणाचा ठपका
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2019 02:05 AM2019-02-16T02:05:56+5:302019-02-16T02:06:17+5:30
जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर सेंटर रुग्णालयात डोळ्यांवरील शस्त्रक्रियेत दाखविलेल्या निष्काळजीमुळे महापालिका रुग्णालयातील कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
मुंबई : जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर सेंटर रुग्णालयात डोळ्यांवरील शस्त्रक्रियेत दाखविलेल्या निष्काळजीमुळे महापालिका रुग्णालयातील कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
या प्रकरणाच्या चौकशीत कूपर रुग्णालयाचे अधिष्ठता डॉ. गणेश शिंदे यांनीही गांभीर्य दाखविले नाही. याची गंभीर दखल आयुक्त अजय मेहता यांनी घेतली असून, एवढ्या मोठ्या सार्वजनिक रुग्णालयाच्या अधिष्ठातापदी त्यांनी असावे का? असा प्रश्न खुद्द आयुक्तांनीच उपस्थित केला आहे. डॉ. शिंदे यांच्या चौकशीचा अहवाल महिन्याभरात सादर झाल्यानंतर, त्यांना या पदावरून हटविण्याबाबत निर्णय घेतला जाईल.
जानेवारीत ट्रॉमा केअर सेंटर रुग्णालयात सात रुग्णांवर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाली. मात्र, त्यानंतर यापैकी पाच रुग्णांची दृष्टी गेल्याचे उजेडात आले. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश कूपरचे अधिष्ठाता डॉ. शिंदे यांना आयुक्तांनी दिले होते. मात्र, शिंदे यांनी थातुरमातुर उत्तर दिल्यामुळे आयुक्तांचे त्यावर समाधान झाले नाही. त्यामुळे अतिरिक्त आयुक्त आय. कुंदन आणि उपायुक्त सुनील धामणे यांची चौकशी समिती स्थापन करण्यात आली. या समितीने तीन परिचारिकांचे निलंबन, ट्रॉमा सेंटरच्या नेत्र विभागाचे प्रमुख आणि सहायक मानद डॉक्टर अरुण चौधरी यांची सेवा खंडित करण्याचे आदेश दिले. मात्र, या अहवालात डॉ. शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर आयुक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
‘निष्ठेने काम करावे’
नेत्र शास्त्रक्रियागार वापराची मार्गदर्शक तत्त्व (एसओपी) पुढच्या महिन्यात तयार करून सर्व पालिका रुग्णालयात राबविण्यात येतील. पालिका रुग्णालयात गरीब रुग्ण उपचारासाठी येतात. धडधाकट शरीर हीच त्यांची संपत्ती असते. त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह अवलंबून असतो. त्यामुळे सावर्जनिक आरोग्य व्यवस्थेत संपूर्ण निष्ठेने काम करणे अपेक्षित असल्याचे मत आयुक्तांनी व्यक्त केले.
यांच्यावर कारवाई...
मुख्य परिचारिका वीणा क्षीरसागर, परिचारिका समृद्धी साळुंखे आणि दीप्ती खेडेकर यांचे निलंबन व विभागीय चौकशी, रुग्णालयाचे रजिस्टर डॉ. मोहम्मद साबीर, डॉ. कुशल काछा, मलमपट्टी करणारे अशोक कांबळे, हितेश उमेश कुंडाईकर यांचीही चौकशी होईल. महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलकडे डॉ. चौधरी यांच्या चौकशीची मागणी करण्यात आली आहे. चौधरी यांना यापूर्वीच सेवेतून निलंबित केले आहे. चौकशी सुरू असेपर्यंत ते कोणत्याही सरकारी रुग्णालयात सेवा करू शकत नाहीत. ट्रॉमा केअर रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एच. एस. बावा यांची विभागीय चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना कोणतीही जबाबदारी देण्यास मनाई करण्यात आली आहे.
यामुळेच डॉ. शिंदे अडचणीत...
जानेवारीत सात रुग्णांवर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाली. डॉ. चौधरी यांच्या मार्गदर्शनखाली दोन निवासी डॉक्टरांनी ही शस्त्रक्रिया केली. दुसऱ्या दिवशी तपासणीसाठी रुग्णांच्या डोळ्यांवरील पट्टी काढताच, त्यात जंतुसंसर्ग झाल्याचे उजेडात आले. त्यामुळे या रुग्णांना तत्काळ केईएम रुग्णालयात पाठविण्यात आले. तीन रुग्णांची दृष्टी कायमस्वरूपी गेल्याचे आढळून आले. केईएम रुग्णालयाने दिलेल्या दुसºया चौकशी अहवालात शस्त्रक्रिया विभागात काळजी न घेतल्याने, तसेच प्रशिक्षित कर्मचारी वर्ग नसल्यामुळे हा प्रकार घडल्याचे नमूद आहे. मात्र, डॉ. शिंदे यांनी आपल्या अहवालात केवळ डॉ.चौधरी आणि दोन निवासी डॉक्टरांवर ठपका ठेऊन कर्मचाºयांना क्लीन चिट दिली होती.