पालघर : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर होणाऱ्या मोटार वाहन अपघातानंतर गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांना वेळीच उपचार मिळत नसल्याने अनेकांना आपल्या प्राणाला मुकावे लागत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रयत्नाने आयआरबी कंपनीच्या पन्नास लाखांच्या निधीतून तलासरी येथे लवरकच सुसज्ज असे ट्रॉमा केअर सेंटर उभारण्यात येणार आहे.पालघर जिल्ह्यातील मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील मनोर, कासा, तलासरी, पोलीस स्टेशनअंतर्गत क्षेत्रामधील महामार्गावरील अपघातामध्ये वाढ होत असून मनोर पोलीस स्टेशनअंतर्गत आॅक्टोबर २०१५ पर्यंत वर्षभरात ३६ गंभीर प्रकारच्या अपघातांत ३७ पुरुषांचा मृत्यू तर ५८ पुरुष जखमी तर ९ स्त्रियांचा मृत्यू तर ६ स्त्रिया जखमी झाल्या आहेत. तर ११४ अपघात दुखापतीशिवाय घडले आहेत. तलासरी पो.स्टे.अंतर्गत १५४ अपघातांच्या घटना घडल्या असून ५० लोकांचा मृत्यू तर २८ लोक जखमी झाले आहेत. तर कासा पोलीस स्टेशनअंतर्गत ६० अपघातांच्या घटना घडल्या असून त्यात ५४ लोकांचा मृत्यू तर १६० लोक गंभीर जखमी झाले आहेत. अहमदाबाद-मुंबई महामार्ग क्र. ८ वर होणाऱ्या अपघातांमध्ये जखमींवर वेळीच उपचार होत नसल्याने त्यांच्या मृत्यूचे पडसाद ६ नोव्हेंबर २०१५ रोजी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये उमटले होते. या वेळी आमदारांनी उपस्थित केलेल्या मुद्याच्या अनुषंगाने महामार्गावर ट्रॉमा केअर सेंटर युनिटच्या उपलब्धतेबाबत तलासरी तहसीलदारांना जागेच्या उपलब्धतेबाबत सूचना करण्यात आल्यानंतर तलासरी ठाकरपाडा येथील गट नं. ८९/५ क्षेत्र ४.०० हेक्टर जागा कुटीर रुग्णालयासाठी राखीव ठेवण्यात आल्याचे कळले. त्यातील ५ एकर जागा ही मोकळी असल्याचे कळल्यानंतर त्यापैकी काही जागा ट्रॉमा केअर सेंटरसाठी उपलब्ध करून देण्याचे जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी जिल्हा शल्यचिकित्सक पालघर यांना कळविले आहे. त्यामुळे लवकरच तलासरीमध्ये उभारण्यात येणाऱ्या ट्रॉमा सेंटरसाठी आयआरबी कंपनीकडून ५० लाखांचा निधी देण्यात येणार असल्याचे आयआरबीचे जी.डी. डांगरे यांनी लोकमतला सांगितले. त्यामुळे ट्रॉमा सेंटरच्या उभारणीनंतर आॅर्थोपेडिक विभाग सुरू होऊन आयसीयू युनिट, आॅपरेशन थिएटर, अपघात कक्ष विभाग, स्पेशल वॉर्ड, एक्स रे विभाग, व्हेंटिलेशन, आॅक्सिजन युनिटसह तत्काळ रुग्णांना सेवा मिळावी म्हणून आॅर्थोपेडिक सर्जन, अॅनास्थेशियातज्ज्ञ इ.ची सोयीसुविधा उपलब्ध होणार असल्याने जखमी रुग्णांचे प्राण वाचणार आहेत. (वार्ताहर) जखमींसाठी संजीवनीच...या तिन्ही पोलीस स्टेशनअंतर्गत घडलेल्या अपघातांमधील जखमींना उपचारासाठी तलासरी ते मनोर पोलीस स्टेशनअंतर्गत ५० किमी अंतरावर एकही सुसज्ज हॉस्पिटल नसून मनोर व कासा येथील ग्रामीण रुग्णालयावर अवलंबून राहावे लागते. परंतु, येथील ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांची कमतरता, अपुऱ्या सोयीसुविधा, आॅर्थोपेडिक सर्जन, अॅनास्थेशियातज्ज्ञ, आॅपरेशन थिएटर इ.ची सोयीसुविधा नसल्याने जखमी रुग्णांना एकतर गुजरात अथवा केंद्रशासित दिव-दमण येथील रुग्णालयात अथवा मीरा रोड येथील हॉस्पिटलशिवाय पर्याय नसतो. अशा वेळी जखमी रुग्णांना वेळीच उपचार मिळत नसल्याने अनेक रुग्णांना आपल्या प्राणाला मुकावे लागत असे.
आयआरबीच्या ५० लाखांतून तलासरीत उभारणार ट्रॉमा सेंटर
By admin | Published: January 02, 2016 8:34 AM