वायकर यांच्या आमदार निधीतून ट्रॉमा, तसेच सेव्हन हिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:06 AM2021-04-21T04:06:59+5:302021-04-21T04:06:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावावर वेळीच नियंत्रण मिळविण्यासाठी आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावावर वेळीच नियंत्रण मिळविण्यासाठी आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रवींद्र वायकर यांनी आपल्या आमदार निधीतून जोगेश्वरीच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सेंटर, तसेच मरोळच्या सेव्हन हिल या दोन्ही रुग्णालयांना प्रत्येक ५० लाख रुपये दिले आहेत. तसे पत्रही त्यांनी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी व के/पूर्वच्या सहायक आयुक्तांना दिले.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राबरोबरच मुंबईतील कोविड रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण पडत आहे. सर्व रुग्णालये, रुग्णांनी भरली आहेत. डॉक्टर्स, नर्स, वॉर्डबॉय सगळेच एकेका रुग्णांचा जीव वाचावा यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. अशावेळी आरोग्यसुविधा कुठेही कमी पडू नयेत, तसेच यंत्रणेवर अधिक ताण येऊ नये यासाठी वायकर यांनी वैद्यकीय यंत्रणा अधिक सक्षम करण्याबरोबरच रुग्णालयातील वैद्यकीय सेवा- सुविधा रुग्णांपर्यंत पोहोचविण्यासाठी आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत १ कोटी रुपये जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील दोन रुग्णालयांना तात्काळ दिले.
या निधीच्या माध्यमातून रुग्णालयांना आवश्यक ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर्स, ऑक्सिजन सिलिंडर्स व ऑक्सिजन रेग्युलेटर्स, बायपॅप मशीन, हॉस्पिटल बेडस्, व्हायटल साइन मॉनिटर्स, एनआरसीयू व्हेंटिलेटर्स, स्ट्रेचर्स, पेशंट ट्राॅली, इमरजन्सी ट्राॅली, फार्मस्युटिकल फ्रीज, कोविड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावावर प्रतिबंधात्मक औषधे व साधनसामग्री घेण्याची विनंती वायकर यांनी मुंबई महानगरपालिकेच्या के/पूर्व विभागाच्या सहायक आयुक्तांना लेखी पत्राद्वारे केली आहे.
दोन रुग्णवाहिकेसाठी दिला आमदार निधी
मुंबई महानगरपालिकेच्या के/पूर्व विभागाच्या सहायक आयुक्तांच्या सूचनेनुसार हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सेंटर व के/पूर्व यांना येथे वैद्यकीय सेवेंतर्गत प्रत्येकी एक, अशा दोन नवीन रुग्णवाहिका तात्काळ खरेदी करता याव्यात यासाठी आवश्यक निधीही वायकर यांनी आमदार निधीतून दिला आहे.
---------------------------------------------