मुंबई : स्थानिक पोलीस, वनविभाग आणि पालिका अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने ट्रॉम्बे खाडीतील तिवरांची कत्तल करून त्यावर झोपड्या उभारणाऱ्या भूमाफियांनी काल रात्री बाबू बादशाह रहिमतुल्ला शेख (४०) या तरुणावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शेखवर चेंबूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शेख एका खासगी वृत्तवाहिनीचा कॅमेरामन असून स्थानिक रहिवासी आहे.या प्रकरणी ट्रॉम्बे पोलिसांनी रफीक शेख (२७), अमीन शेख (२७), जमीर सय्यद (२५) आणि अहमद अन्वर शेख (२७) या चौघांना दंगल, मारहाणीचा गुन्हा नोंदवून अटक केली. या चौघांचे दोन साथीदार फरार आहेत. खाडीत भराव घालून, तिवरांची कत्तल करून भूमाफिया झोपड्या उभारत आहेत. याबाबत लोकमतने वृत्त प्रसिद्ध करताच पोलीस, वनविभाग आणि पालिका अधिकारी जागे झाले आणि त्यांनी काल येथील अवैध झोपड्या उद्ध्वस्त केल्या.हे पाडकाम सुरू असताना वृत्त संकलनासाठी शेख तेथे गेले. त्यांनी ही कारवाई आपल्या कॅमेऱ्यात टिपली. त्या वेळी आरोपीही तेथे हजर होते. रात्री अकराच्या सुमारास घरी परतणाऱ्या शेख यांना या भूमाफियांनी ट्रॉम्बेतील पायलीपाडा येथे गाठले. बांबू आणि लोखंडी रॉडने त्यांना अमानुष मारहाण करण्यात आली. या मारहाणीमुळे शेख बेशुद्ध पडले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार स्थानिकांनी हस्तक्षेप केला नसता तर त्यांची हत्याही झाली असती. पुढे स्थानिकांनी ट्रॉम्बे पोलिसांना बोलावून घेतले. पोलीस गाडीतून सायन रुग्णालयात जात असतानाच शेख यांची प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांना चेंबूरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.(प्रतिनिधी)
ट्रॉम्बेत भूमाफियांचा तरुणावर प्राणघातक हल्ला
By admin | Published: November 22, 2014 1:04 AM