Join us

प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचे कामबंद आंदोलन

By admin | Published: March 18, 2015 1:20 AM

ठाणे महापालिकेच्या कळवा रुग्णालयात प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे एका गर्भवती महिलेला आपले बाळ गमवावे लागल्याच्या प्रकरणाने आता वेगळेच वळण घेतले आहे.

ठाणे : ठाणे महापालिकेच्या कळवा रुग्णालयात प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे एका गर्भवती महिलेला आपले बाळ गमवावे लागल्याच्या प्रकरणाने आता वेगळेच वळण घेतले आहे. पोलिसांनी रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्सच्या विरोधात अर्धवट माहितीच्या आधारे गुन्हा दाखल केला, असा दावा करीत याचा निषेध करण्यासाठी प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. त्यांच्या आंदोलनामुळे रुग्णसेवेवर परिणाम झाला आहे. जोपर्यंत योग्य चौकशी होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. ठाणे महापालिकेने अतिरिक्त आयुक्त आणि मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली द्विसदस्यीय चौकशी समिती स्थापन केली आहे. तीन दिवसांत ही समिती आपला अहवाल पालिका आयुक्तांना सादर करेल. त्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे. परंतु तत्पूर्वीच कळवा रुग्णालय प्रशासनाकडून सादर झालेल्या प्राथमिक अहवालानुसार रुग्णालयातील डॉक्टर सविता उपडे आणि नर्स मीनाक्षी सोनार यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. रुग्णालयातील ४३ हाउसमनसह २६ रजिस्टार्ड अशा एकूण ६९ प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या रुग्णालयात ओपीडीमध्ये रोज १५००च्या आसपास रुग्ण येत आहेत. तसेच रोज १० ते १५ प्रसूती होतात. सुमारे ३० विविध प्रकारच्या छोट्या-मोठ्या शस्त्रक्रिया होत आहेत. आंदोलनामुळे आता या सर्वच सेवांवर परिणाम झाल्याचे रुग्णालय प्रशासनाने मान्य केले. परंतु आयुक्तांनी जी द्विसदस्यीय समिती नेमली आहे, त्याचा अहवाल आल्यानंतरच या प्रकरणातील सत्य समोर येणार आहे. रुग्णांना सेवा देण्यासाठी इतर अतिरिक्त डॉक्टरांची फौज तयार ठेवण्यात आली असून, त्यांच्यामार्फत रुग्णांना सेवा दिली जात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.सुरुवातीला डॉ. सविता यांची कोणतीही चौकशी न करता त्यांना निलंबित करण्यात आले. त्यानंतर चौकशी पूर्ण होण्याआधीच त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. प्रत्यक्षात त्यांनी रुग्णाकडून पैसे मागितले नव्हते. केवळ, काही टेस्ट बाहेरून करण्यास सांगितले होते. तसेच रुग्णावर उपचार सुरू असताना घोडे दाम्पत्याने स्वत:च्या जबाबदारीवर डिस्चार्ज घेतला होता. परंतु, याची शहानिशा न करता केवळ निवासी डॉक्टरांना टार्गेट केले जात आहे. याविरोधातील आमच्या आंदोलनाला सेंट्रल मार्डनेदेखील पाठिंबा दिला आहे.- डॉ. पंकज पवार, जनरल सेक्रेटरी, मार्ड, ठाणे