शून्य आयकॉनिक पुलावरून प्रवास करा सुसाट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2023 02:16 PM2023-10-09T14:16:01+5:302023-10-09T14:17:19+5:30
वाकोला नाल्यावर मेट्रो लाइन २ बी व्हायाडक्टच्या ‘शून्य आयकॉनिक ब्रिज’ या केबल-स्टेड ब्रीजचे बांधकाम सुरू आहे.
मुंबई : ‘शून्य’ या संकल्पनेचे महत्त्व अधोरेखित करणारा व स्थापत्यकामांतील वास्तुकलेचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून ओळखला जाणारा आयकॉनिक केबल स्टेड पूल एमएमआरडीए उभारत आहे. वाकोला नाल्यावर हा पूल उभारण्यात येणार असून, मुंबईकरांना या पुलावरून सुसाट प्रवास करता येणार आहे.
वाकोला नाल्यावर मेट्रो लाइन २ बी व्हायाडक्टच्या ‘शून्य आयकॉनिक ब्रिज’ या केबल-स्टेड ब्रीजचे बांधकाम सुरू आहे.
या आयकॉनिक पुलाची एकूण लांबी १३० मीटर आहे. त्यातील ८० मीटर लांबीचा मुख्य स्पॅन वाकोला नाल्यावर आहे. पी ४७८ येथील शून्य आयकॉनिक ब्रीजसाठी मोठ्या पाइल कॅपचे बांधकाम पूर्ण करण्यात आले.
आमच्या अभियंत्याच्या कौशल्यातून अशा वास्तुकला निर्माण करून मुंबईला एक वेगळी ओळख देण्यासाठी प्राधिकरण सदैव प्रयत्नशील राहील. तसेच अद्ययावत उपकरणे व तंत्रज्ञानाच्या वापरातून निर्माण होणाऱ्या स्थापत्यशास्त्राच्या अशा निर्मितीचे आपण साक्षीदार होत आहोत.
- संजय मुखर्जी, एमएमआरडीए महानगर आयुक्त.
६७० घन मीटर काँक्रिट
- या पाइल फाउंडेशन कॅपचे मोजमाप २०.६ मी x १२ मी x ३ मीटर आहे.
- या पाइल कॅपमध्ये सुमारे ६७० घनमीटर काँक्रीट वापरण्यात आले आहे.
- यासाठी १९७ मेट्रिक टन लोखंडी सळ्यांचा
वापर करण्यात आला आहे.
- याशिवाय ७५ मिमी व्यासाचे १२० थ्रेडेड स्ट्रेस बार्स (एफएफटी बार्स) या पाइल कॅपमध्ये बसविण्यात आलेत.
उष्णता कमी करण्यासाठी उपाय
- काँक्रिटीकरणासाठी काँक्रीट तापमान निरीक्षण प्रणाली वापरून आवश्यक तापमान राखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात आल्या.
- तापमान निरीक्षण उपकरणे आणि सेन्सर तीन वेगवेगळ्या स्तरांवर पाइल कॅपमध्ये बसविण्यात आले आणि खोलीनुसार वर्गीकृत करण्यात आले.
- काँक्रीटवरील उष्णतेचा प्रभाव कमी करण्यासाठी थंड पाणी आणि बर्फाचे तुकडे वापरण्यात आले.
- तसेच ट्रान्झिट मिक्सर थंड अवस्थेत ठेवण्यासाठी पाण्याचे फवारे (स्प्रिंकलर) व झाकण्यासाठी हेसियन कापडाचा वापर केला गेला.