मुंबई : कोरोनाला हरविण्यासाठी लागू करण्यात आलेले लॉकडाऊन आता शिथिल होत असले तरी अद्यापही मुंबईची लोकल पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाही. परिणामी प्रवाशांचा सर्व भार ‘बेस्ट’वर पडत आहे. मात्र या प्रवाशांना अडचणींना सामोरे जावे लागू नये म्हणून बेस्टही पूर्ण क्षमतेने रस्त्यांवर धावत असून, प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्टने एसटीचीही मदत घेतली आहे. परिणामी बेस्टने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे प्रमाण वाढत असून, बेस्ट आणि प्रवासी आता पूर्वपदावर येत असल्याचे चित्र आहे.
सूत्रांच्या म्हणण्यानुसार, आजघडीला बेस्टने दिवसागणिक सुमारे २३ लाख प्रवासी प्रवास करत आहेत. २०१८ मध्येही दिवसागणिक बेस्टने प्रवास करत असलेल्या प्रवाशांचे प्रमाण हेच होते. विशेषत: कोरोना काळात बेस्टने प्रवाशांना मोठा दिलासा दिला असून, लॉकडाऊन काळात बेस्टकडे मुंबईची लाईफलाइन म्हणून पाहिले जात आहे. जूनपासून नोव्हेंबर या कालावधीचा विचार करत जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्यात बेस्टने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे प्रमाण वाढले आहे. जून महिन्यात हे प्रमाण ८ लाख होते. जुलै महिन्यात हे ९ लाख झाले. ऑगस्ट महिन्यात १० लाख, तर सप्टेंबर महिन्यात १८ लाख झाले. ऑक्टोबर महिन्यात हे प्रमाण २१ लाख आणि आता नोव्हेंबर महिन्यात बेस्ट बसने प्रवास करणाऱ्यांचे प्रमाण २३ लाख झाले आहे.