मुंबई :
कोरोनाकाळात रेल्वेचे वेळापत्रक पार कोलमडून गेले होते. कोरोनाचे निर्बंध कमी झाल्याने हळूहळू एकेक गाड्या रुळावर आल्या, मात्र रेल्वेतील बेडरोल, जनरल बोगी बंदच होत्या. आता एकेक सुविधा सुरू झाल्या असून, येत्या २९ जूनपासून मध्य रेल्वेच्या १६५ गाड्यांमध्ये जनरल तिकिटांची सुविधा सुरू होणार आहे. मेल आणि एक्स्प्रेस रेल्वेमध्ये जनरल तिकीट घेऊन प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. तब्बल दोन वर्षांच्या काळानंतर आता प्रवाशांना जनरल तिकिटावर प्रवास करता येणार आहे.
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे रेल्वे प्रवासावर अनेक बंधने आली होती. नंतर टप्प्याटप्प्याने हे निर्बंध शिथिल करण्यात आले. त्यानंतर देशातील विविध मार्गांवर काही स्पेशल ट्रेन सुरू करण्यात आल्या. कोरोनाकाळात खबरदारीचा उपाय म्हणून ट्रेनमधील गर्दी टाळण्यासाठी जनरल तिकीट बंद करण्यात आले होते. केवळ ज्यांनी सीट आरक्षित केली आहे, अशांनाच फक्त रेल्वे प्रवास करता येत होता.