मुंबई - मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील लोकलमध्ये विनातिकिट प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त आहे, तर मध्य रेल्वे मार्गावरील महिलांच्या प्रथम श्रेणीच्या डब्यांमध्ये द्वितीय श्रेणीचे तिकिट असलेल्या महिला प्रवास करतात. प्रथम श्रेणीचे तिकिट असलेल्या महिलांना नाहक त्रास सहन करावा लागतो. प्रथम श्रेणीतील डब्यामध्ये तिकिट तपासकाची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाने केली आहे.काही रेल्वे स्थानकावरील तिकिट तपासक रेल्वे कार्यालयात बसून राहतात, असा आरोप या महासंघाकडून करण्यात आला आहे. या संदर्भात महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघटनेने रेल्वे प्रशासनाला निवेदन दिले आहे. गर्दीच्यावेळी द्वितीय श्रेणीतील महिला प्रवासी प्रथम श्रेणीच्या डब्यातून प्रवास करतात.प्रथम श्रेणीचे तिकिट असलेल्या महिलांना बसण्यास किंवा काहीवेळेस उभे राहण्यास देखील जागा उरत नाही़ जीव धोक्यात घालून काहीवेळा दरवाज्याच्या शेजारी उभे राहून प्रवास करावा लागतो, असे महासंघटनेच्या अध्यक्षा वंदना सोनावणे यांनी सांगितले. प्रथम श्रेणीच्या डब्यात विशेष तिकिट तपासक पथकांची नेमणूक करण्यात यावी, जेणेकरून अनियमित आणि विना तिकिट प्रवास करणाºया प्रवासांवर कारवाई केली जाईल, असे संघटनेच्या उपध्यक्षा अनिता झोपे यांनी सांगितले.
प्रथम श्रेणीतून द्वितीय श्रेणीतील महिलांचा प्रवास , तपासकांची नेमणूक करण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2019 4:14 AM