मुंबई : ब्रेक लागलेल्या मुंबईतील वाहतुकीला फास्ट ट्रॅकवर टाकण्याच्या मोहिमेतील दुसरा अडसरही महापालिकेने दूर केला आहे. कोस्टल रोड प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाल्यानंतर आता महत्वाकांक्षी गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता (जीएमएलआर) प्रकल्पाच्या मार्गही मोकळा झाला आहे. पूर्व आणि पश्चिम उपनगराला जोडणाऱ्या या चौथ्या रस्त्यासाठी राष्ट्रीय वन्यजीव महामंडळाचीही परवानगी मिळाली आहे. त्यामुळे या मार्गावरून गोरेगाव ते मुलुंड हा प्रवास केवळ १५ मिनिटांत पार होणार आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईत वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढले आहे. मुंबईकरांचा महत्वाचा वेळ प्रवासातच वाया जात आहे. वाहतूक कोंडीत वाया जाणारा वेळ, पैसे व इंधन वाचविण्यासाठी पूर्व आणि पश्चिम उपनगराला जोडणारे प्रकल्प महापालिकेने हाती घेतले आहेत. त्यानुसार सांताक्रूझ-चेंबूर जोड रस्ता, अंधेरी-घाटकोपर जोड रस्ता, जोगेश्वरी-विक्रोळी जोड रस्ते बांधण्यात आले आहेत. आता गोरेगाव येथील फिल्म सिटी रोड आणि मुलुंडला जोडणारा १२.७ किलोमीटरचा हा सहापदरी रस्ता तयार होणार आहे. या प्रकल्पासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून ४.७ किलोमीटरचे दोन भुयार तयार करण्याचे प्रस्तावित आहे.
यामुळे वन्यजीवांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने राष्ट्रीय वन्यजीव महामंडळ आणि राज्य वन विभागाची परवानगी आवश्यक ठरली होती. काही अटी व शर्तींवर महामंडळाने ना हरकत प्रमाणपत्र दिल्याचे सुत्रांकडून समजते. महापालिकेला याबाबत अधिकृतपणे कळविण्यात आलेले नाही. भूमिगत बोगद्यांमुळे वन्यजीवांवर कोणताही परिणाम होणार नाही, याची काळजी घेणार असल्याची खात्री दिल्यामुळेच ही परवानगी मिळाली असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. वन विभागाकडूनही परवानगी मिळण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.प्रकल्पाचा खर्च तीनपट वाढला...अमेरिकेतील सल्लागार कंपनीने १९६३ मध्ये गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता बांधण्याची शिफारस केली होती. २०१२ मध्ये या प्रकल्पावर काम सुरु झाले़ त्यावेळीस १३०० कोटी रुपये खचार्चा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र विविध परवानगी मिळवत या प्रकल्पाला प्रत्यक्षात उतरविण्यात बराच कालावधी लोटला. परिणामी या प्रकल्पाचा खर्च आता ४६७८ कोटींवर पोहचला आहे.प्रकल्पासाठी निधीची तरतूदया प्रकल्पासाठी महापालिकेने सन २०१९-२०२० च्या अर्थसंकल्पात १०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. जकात कर बंद झाल्यामुळे महापालिकेने आपल्या महत्वाकांक्षी प्रकल्पांसाठी राखीव निधी उचलण्यास सुरुवात केली आहे. या प्रकल्पासाठी विविध राखीव निधीतून पैसा उभा करण्यात येणार आहे.च्जीएमएलआर १४ कि.मी. असणार आहे. सहापदरी मार्ग, ४.७ किलोमीटरचे भुयारी मार्ग असणार आहेत. गोरेगाव ते मुलुंड हा सध्या तास-दीड तासांचा प्रवास अवघ्या १५ ते २० मिनिटांमध्ये होणार आहे.