Join us  

प्रवासकोंडीचे ग्रहण सुटले, मध्य रेल्वेवर जम्बो ब्लॉकला पूर्णविराम

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2024 5:50 AM

अप आणि डाऊन अशा दोन्ही मार्गांवर दाखल होणाऱ्या लोकल विलंबाने धावत असल्याने अप व डाऊन मार्गांवर प्रवाशांना बराच वेळ फलाटांवर ताटकळत उभे राहावे लागत होते. 

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि ठाणे येथील फलाटांच्या विस्तारीकरणासाठी घेण्यात आलेला जम्बो ब्लॉक रविवारी समाप्त झाला. त्याबरोबरच मुंबईकरांचे प्रवासकोंडीचे ग्रहणही सुटले. रविवारी दुपारपर्यंत गर्दीचा गोंधळ मात्र कायम होता. भायखळा, वडाळा, दादर, कुर्ला, घाटकोपरसारख्या मोठ्या रेल्वे स्थानकांवर उतरलेल्या गर्दीमुळे फलाटांवर उभे राहण्यास जागा नव्हती.

रविवारी सकाळी, दुपारी लोकल भायखळा आणि वडाळ्यापर्यंत धावत होत्या. त्यामुळे येथे उतरून प्रवाशांना फोर्ट परिसरात दाखल होण्यासाठी बेस्ट बस पकडावी लागत होती. मात्र प्रवाशांच्या तुलनेत बेस्ट सेवा कमी असल्याने बेस्टला गर्दी होती. अप आणि डाऊन अशा दोन्ही मार्गांवर दाखल होणाऱ्या लोकल विलंबाने धावत असल्याने अप व डाऊन मार्गांवर प्रवाशांना बराच वेळ फलाटांवर ताटकळत उभे राहावे लागत होते. 

मेल-एक्स्प्रेसचा वेळ वाचणारछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे फलाटांच्या विस्तारीकरणामुळे मेल-एक्स्प्रेसचा वळसा वाचणार आहे. मेल एक्स्प्रेस एका सरळ रेषेत फलाटांवर दाखल होतील. त्यामुळे ३० सेकंद वाचतील, असा दावा रेल्वेने केला आहे. 

ठाण्यातही दिलासा ठाण्यातील फलाट विस्ताराचे काम वेळेआधीच पूर्ण झाल्याने प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास साेडला. विशेष ब्लॉक आणि मुख्य पायाभूत सुविधांचे काम पूर्ण झाल्यानंतर, ठाणे स्थानकाच्या फलाट क्रमांक पाचवरून १ वाजून १३ मिनिटांची कसाराकरिता पहिली लोकल, तर नंदीग्राम एक्स्प्रेस ५ वाजून २१ मिनिटांनी रवाना झाली.

टॅग्स :रेल्वे