प्रवास अवघ्या ५ ते २0 मिनिटांत
By admin | Published: March 5, 2017 03:37 AM2017-03-05T03:37:05+5:302017-03-05T03:37:05+5:30
मुंबईसह, ठाणे, पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढत जाणारी वाहनांची संख्या, त्यामुळे वाहतूककोंडीची तीव्र बनत असलेली समस्या पाहता, आता यातून दोन वर्षांत
- सुशांत मोरे, मुंबई
मुंबईसह, ठाणे, पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढत जाणारी वाहनांची संख्या, त्यामुळे वाहतूककोंडीची तीव्र बनत असलेली समस्या पाहता, आता यातून दोन वर्षांत मुक्तता मिळण्याची चिन्ह आहेत. महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने पश्चिम उपनगरासाठी ‘रो-रो’ (रोल आॅन रो आॅफ) सेवा या जलवाहतुकीचा बिग बजेट प्रकल्प आखला आहे. यात मार्वे ते मनोरी, बोरीवली ते गोराई, भार्इंदर ते वसई, विरार ते टेंभिखोडावे असे जलवाहतूक मार्ग असून, त्यामुळे तासाभराचा प्रवास अवघ्या पाच ते वीस मिनिटांत होईल.
मुंबई शहरासह पश्चिम उपनगराचा विस्तारही झपाट्याने वाढत आहे. बोरीवली ते विरार या पट्ट्यात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात रहिवासी संकुल उभे राहिलेत. त्याप्रमाणेच, येथील वाहतूक व्यवस्थाही वाढत गेली आणि त्यामुळे मोठा ताण पडत गेला. त्यामुळे पश्चिम उपनगरात वाहनाने प्रवास केल्यास तासन्तास वेळ लागतो. वाहतूककोंडीतून मुक्तता करण्यासाठी म्हणून महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाकडून ‘रो-रो’ जलवाहतुकीचा पर्याय निवडण्यात आला आहे. यासाठी उपनगरातील बोरीवली ते गोराई, मार्वे ते मनोरी, भार्इंदर ते वसई, विरार ते टेंभिखोडावे (पालघर जिल्हा) असे मार्ग निवडण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. या मार्गांवर मोठ्या प्रमाणात प्रवासी आणि वाहन क्षमतेच्या बोटी चालवण्यात येतील. एका बोटीची प्रवासी क्षमता ही जवळपास २00 आणि वाहने वाहून नेण्याची क्षमता ही १00 एवढी असणार आहे. दर एक तासाला एक बोट चालवण्याचे नियोजन असल्याचे सांगण्यात आले. या प्रकल्पांसाठी चार कंपन्या पुढे आल्या आहेत. सध्या चारही मार्गांवरील जेट्टीची दुरुस्ती करण्यासाठीही दोन दिवसांपूर्वीच निविदाही काढल्या असून, प्रकल्प २0१८पर्यंत पूर्ण केला जाईल.
यातील मार्वे ते मनोरी आणि बोरीवली ते गोराई पाहिल्यास, या ठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक येतात. येथे बीच, पॅगोडा यांसारख्या वास्तू असून, पर्यटक येथे भेट देतात. त्यामुळेच वाहनचालकांची आणि खासकरून पर्यटकांची गैरसोय होऊ नये, म्हणून येथे रो-रो जलवाहतूक सेवा सुरू करण्यावर भर देण्यात आला आहे. मार्वे ते मनोरी हा प्रवास एखादे वाहन घेऊन केल्यास ७५ मिनिटे लागतात, पण जलवाहतुकीमुळे हाच प्रवास अवघ्या पाच मिनिटांत होईल. बोरीवली ते गोराईचा प्रवासही ५0 मिनिटांवरून अवघ्या पाच मिनिटांवर येईल. ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील जलवाहतुकीलाही मेरिटाइम बोर्डाकडून चालना देण्यात येत आहे. यातील सर्वांत महत्त्वाचे म्हणजे विरार ते टेंभिखोडावे असा वाहनाने दोन तास लागणारा प्रवास अवघ्या १० मिनिटांवर येणार आहे. त्यामुळे विरार आणि पालघर जिल्ह्यातील वाहनचालकांचा बराचसा प्रवासवेळ यामुळे वाचेल. भार्इंदर ते वसई हा प्रवासही रो-रोमुळे २0 मिनिटांत होईल.
२३ लाखांपेक्षा अधिक वाहने मुंबईत सध्याच्या घडीला धावत आहेत.
ठाणे क्षेत्रात म्हणजेच ठाणे, वसई, कल्याण, वाशी या क्षेत्रात तब्बल ३२ लाख ५० हजार १८८ वाहने रस्त्यावर धावत आहेत.