प्रवासी कट्टा - रात्रभर लोकल हव्या; २४ तास लोकल सेवा काळाची गरज
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2019 12:37 AM2019-10-31T00:37:20+5:302019-10-31T06:19:07+5:30
सीएसएमटीहून रात्री १२.२५ ला सुटणारी लोकल कर्जतला रात्री २.४५ वाजता पोहोचते.
मुंबईत नाइटलाइफ सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. निवडणुकीच्या काळात तसे आश्वासन दिले होते. ते पाळायचे
असेल, तर वाहतुकीच्या पुरेशा सोयी उपलब्ध करून द्याव्या लागतील. मुंबईची जीवनवाहिनी असलेली उपनगरी गाड्यांची- लोकलची वाहतूक रात्रभर सुरू ठेवावी, अशी मागणी होते आहे. सध्या रात्री साडेतीन तास लोकल वाहतूक बंद असल्याने बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांनाही खोळंबून राहावे लागते. तसेच विविध आस्थापनांत रात्री उशिरापर्यंत काम करणाºया नोकरदारवर्गाची यामुळे सोय
होईल. हे करीत असताना रिक्षा आणि टॅक्सीचालकांच्या मनमानीवर नियंत्रण आणायला हवे. रात्रीच्यावेळी प्रवाशांच्या सुरक्षेकडेही लक्ष देणे गरजेचे आहे, असे मत ‘लोकमत’च्या वाचकांनी ‘प्रवासी कट्टा’ च्या व्यासपीठावर व्यक्त केले.
सीएसएमटीहून रात्री १२.२५ ला सुटणारी लोकल कर्जतला रात्री २.४५ वाजता पोहोचते. रात्री २.३५ वाजता कर्जतहून सीएसएमटी दिशेकडे जाणारी पहिली लोकल सुटते. त्यामुळे रात्रीच्या वेळी लोकल सेवा बंद असते, असे म्हणजे योग्य नाही. लोकलला, रेल्वेमार्गाला विश्रांती-दुरुस्तीसाठी वेळेची गरज असते. रात्रीच्या दोन ते तीन तासांच्या कालावधीत लोकल आणि रेल्वेमार्गांची देखभाल आणि दुरुस्ती केली जाते. सिग्नल यंत्रणा, ओव्हरहेड वायरची दुरुस्ती केली जाते. ही कामे रात्रीच्या वेळी केली जातात. तेव्हाच या लोकल संपूर्ण दिवसभर योग्यरीत्या धावू शकतात. - शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे
रात्रीही लोकल धावल्या पाहिजेत
मुंबईला जागतिक पातळीवरील शहर बनविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण मुंबईची जीवनवाहिनी समजली जाणारी लोकलसेवा मध्यरात्री बंद ठेवणे ही बुरसटलेली व्यवस्था आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून मुंबईत नाइटलाइफ सुरू करण्याचा विचार होत असताना लोकलसेवा मात्र रात्री बंद राहते, हे विसंगत आहे. मुंबई शहर हे जागतिक पातळीवरील मोठे आर्थिक, चित्रपटनिर्मितीमध्ये लॉस एंजिलसच्या हॉलीवूडनंतरचे मोठे केंद्र आहे. या शहराचे जगभरातील पर्यटकांमध्ये मोठे आकर्षण आहे. या शहरातील वैद्यकीय क्षेत्रातील मोठमोठी पंचतारांकित रुग्णालये नावारूपास आलेली आहेत. त्यामुळे कधीकधी अति तातडीची गरज म्हणून अनेक सामान्य रुग्णांना लोकलसेवेचा आधार असतो. मुंबईत अनेक उद्योग आस्थापना २४ तास चालू असतात. यात काम करणाऱ्यांना मध्यरात्रीनंतर मुंबईबाहेर असलेल्या कल्याण, बदलापूर, आसनगाव, नवी मुंबई, पनवेल, वसई ,विरार, बोरीवली या ठिकाणी पोहोचणे खूप त्रासदायक बनते. हॉटेल उद्योग, मनोरंजन उद्योगाच्या महसूल वाढीसाठी व ‘पिक अवर’मध्ये प्रवाशांची गर्दी टाळण्यासाठी रात्री लोकल चालविणे योग्यच ठरेल. भलेही फेºयांची संख्या दर अर्ध्या तासाने असली तरी चालेल, पण ही सेवा चालू राहावी. तसेही रेल्वेची लांब पल्ल्यांची एक्स्प्रेस सेवा रात्रभर चालूच असते. त्याला लोकलसेवा अपवाद ठरू नये. - राजकुमार पाटील, मुरबाड
लोकल रात्रभर सुरू ठेवणे व्यवहार्य नाही
पाश्चिमात्य देशाप्रमाणे मुंबईमध्येही नाइटलाइफ असावे. रात्रभर हॉटेल, सिनेमा हॉल आणि मॉल सुरू राहावेत. यासाठी विशिष्ट समाज घटकांकडून सातत्याने मागणी होत आहे. ती पूर्ण होण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईची लोकल वाहतूक रात्रभर सुरू ठेवावी अशीही मागणी होत आहे. मुळात सर्वच मुंबईकरांना अशा प्रकारचे नाइटलाइफ हवे आहे का? तर त्याचे उत्तर नाही. कारण नाइटलाइफची संस्कृती ही खरेतर एक प्रकारे धनिक, श्रीमंतांचाच टाइमपास आहे. सर्वसामान्य मुंबईकरांचा नाइटलाइफशी काहीही संबंध नाही. दुसरे म्हणजे रात्रभर लोकल सुरू ठेवल्याने गुन्हेगारी वाढण्याचीही शक्यता आहे. लोकलची देखभाल, दुरुस्ती, सिग्नल यंत्रणा आदी अनेक कारणांसाठी रात्रीची लोकल सेवा बंद असते. पण लोकल वाहतूक नाइटलाइफच्या नावाखाली रात्रभर सुरू ठेवणे व्यवहार्य होणार नाही. - प्रदीप मोरे, अंधेरी
टॅक्सी, रिक्षाचालकांकडून लूट होईल
मुंबईत सध्या काही प्रमाणात नाइटलाइफ अस्तित्वात आहे. त्यालाच व्यावसायिक रूप देऊन पाश्चिमात्य देशांच्या पातळीवर नेण्याचा घाट घातला जात आहे. आपला ऐतिहासिक ठेवा, वारसा जगापुढे मांडण्यासाठी आणि त्यांचे जतन करण्यासाठी केले जाणारे प्रयत्न स्तुत्यच. पण तसे प्रयत्न अभावानेच होताना दिसतात. मात्र विदेशात चालू असलेल्या प्रकारांचे फक्त चैन आणि मौजमजेसाठी येथे आयोजन होणार असेल, तर ते आपल्या संस्कृतीला साजेसे नाही. विदेशी प्रकारांचे कार्यक्रम रात्रीसाठीच ठरविले जातात. ज्याला ‘नाइटलाइफ’ असे संबोधिले जाते. अशा कार्यक्रमांच्या आयोजनस्थळी पोहोचण्यासाठी रस्ते, रेल्वे यांचा दिवसरात्र घड्याळाप्रमाणे वापर होणार आहे. आपल्याकडे याकरिता सुरक्षित सुविधा पुरेशा आहेत का? रस्त्यांवर गरजेनुसार वाहने आणि लोकल जरी उपलब्ध असल्या, तरी ती यंत्रेच आहेत. त्या यंत्रांच्या अहोरात्र चालण्याच्या क्षमतेचा आणि विश्रांतीसाठीचा विचार प्रथम व्हायला हवा. जिथे मुंबईत रेल्वेद्वारे बाहेरगावाहून येणाºया प्रवाशांची रात्री लोकल बंद असल्यामुळे टॅक्सी, रिक्षाचालकांकडून लूट होते. तिथे नियम पाळणारे आणि त्यांच्यावर नजर ठेवणारे रक्षक असावेत. अजूनही आपल्या राज्यासह देशात दिवसाढवळ्या महिला असुरक्षितच आहेत. नाइटलाइफमध्ये त्यांच्या रात्रीच्या प्रवासाची सुरक्षा अधिक कठोर होणे गरजेचे आहे. त्यासाठी ठोस उपाययोजनांची प्रामाणिक अंमलबजावणी होण्यासाठी सरकार, पालिका, पोलीस यंत्रणा सदैव जागरूक असाव्या लागतील. दिवसा कार्यालयात थकूनभागून घरी जाणारा कर्मचारी कार्यक्रमात किती सहभागी होईल, हे आताच ठरविणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे मूठभर शौकिनांसाठी नाइटलाइफ मर्यादितच राहील. - राजन पांजरी, जोगेश्वरी
२४ तास लोकल सेवा काळाची गरज
मुंबई परिसरातील लाखो प्रवाशांची जीवनवाहिनी असणाºया उपनगरीय लोकल सेवांबाबत अजूनही रेल्वे प्रशासनाकडून खूप अपेक्षा आहेत. दिवसेंदिवस मुंबईच्या आसपासच्या मोठ्या प्रमाणावर नागरीकरणामुळे लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळेच शासनानेदेखील एमएमआरडीएचे क्षेत्र वाढवून दळणवळणाच्या सोयी उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मुंबई चोवीस तास जागी असते आणि अनेक खाजगी, सरकारी कार्यालयांत रात्रपाळीची कामे चालतात. त्याचप्रमाणे बाहेरगावी जाणाºया आणि येणाºया प्रवाशांची मोठी वर्दळ मुंबईत असते. उपनगरी सेवा रात्रभर सुरू राहणे, ही आता काळाची गरज आहे. यासाठी रात्री उशिरा निदान अर्ध्या तासाच्या अंतराने लोकल चालू व्हायलाच हव्यात. रात्री बारा - एकपर्यंत कल्याण, अंबरनाथ, पनवेल, टिटवाळा, वसई या स्थानकांवर मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची वर्दळ असते. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई परिसरात २४ तास लोकलसेवा उपलब्ध होणे, हे अपरिहार्य आहे. मात्र सध्या उपलब्ध मार्गिका, लोकल रेकची अनुपलब्धता, मनुष्यबळाची कमतरता हे बघता रेल्वे कितपत याचा गांभीर्याने विचार करेल, याबाबतीत साशंकताच आहे. तसेच जर लोकल चालू करायच्या असतील तर त्या लांब-पल्ल्यांच्या कर्जत, कसारा, पनवेल, विरार अशा चालविल्या जाव्यात, म्हणजे त्याचा फायदा जास्तीतजास्त प्रवाशांना होईल. - अनंत बोरसे, शहापूर
‘नाइटलाइफ’पेक्षा इतर सुविधांकडे लक्ष द्या
निवडून येण्यासाठी निवडणुकीत अवास्तव आश्वासने दिली जातात. सत्तेवर आल्यानंतर ती पूर्ण करायची असतात याचे सत्तेत येऊनही भान राहात नाही. किती निवडणुका आल्या आणि गेल्या; पण अन्न, पाणी, निवारा, शिक्षण, आरोग्य, बेरोजगारी, शेतकºयांचे प्रश्न आणि त्यातून कर्जबाजारी शेतकºयांच्या मंत्रालयाच्या दारापर्यंत पोहोचलेल्या आत्महत्या हे तळागाळातील लोकांच्या रोजच्या जीवनमानाशी भेडसावणारे अनेक वर्षांचे जाणूनबुजून दुर्लक्षित ठेवले गेले. पण हे प्रश्न बाजूला ठेवत काही विशिष्ट गटांस ‘नाइटलाइफ’ हवे आहे. मुंबईत ‘नाइटलाइफ’ करायचे म्हणजे मौजमजेसाठी गेलेल्यांना रात्री लोकल बंद करून रेल्वे प्लॅटफॉर्मवर बसवून नाही चालणार. त्यासाठी लोकल रात्रभर सुरू ठेवाव्या लागतील. यामुळे रात्री-बेरात्री मेल, एक्स्प्रेसने येणाºयांची सोय होईलही. मात्र रात्री सुरक्षेचा प्रश्न निर्माण होणार आहे. अतिरिक्त ताणामुळे पोलीस हैराण आहेत. त्यांच्यावर आणखी किती भार टाकणार? त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने विचार व्हायला हवा. मंत्री, आमदारांची सुरक्षा कमी करून वा काढून त्या पोलिसांना याकामी लावता येण्यासारखे आहे. आरोग्य, पाणी या नागरी सुविधाही अपुºया पडणार आहेत. त्या कशा पुरवल्या जाणार? पावसाळ्यात मुंबई कधीही तुंबते मग हे नाइटलाइफ नोव्हेंबर ते मेपर्यंतच असणार का? बेस्टची सेवाही रात्रभर ठेवावी लागणार. या ‘नाइटलाइफ’ने हौसमौज करायला येणारा सामान्य नोकरदारही या चक्रात गुरफटून कर्जबाजारी होणार आहे. नाइटलाइफचे हे चोचले थांबवून खेडोपाड्यातील उपासमारीकडे लक्ष द्या. - मुरलीधर धंबा, डोंबिवली
रात्री लोकल सेवा सुरू ठेवण्यास नियम बदलावे
मुंबईकरांकडून खरोखरच जोरदार मागणी आली, रात्रीच्या कामांच्या तासांत वाढ झाली, तर मुंबईत रात्रभर लोकलवाहतूक सुरू ठेवण्यास हरकत नसावी. बरेच व्यवहार आणि आस्थापने दिवसा कार्यरत असतात. त्यामुळे रात्रीच्या प्रवाशांचे प्रमाण अत्यल्प असणार, हे ओघाने आलेच. सध्या अंदाजे साडेतीन तास रेल्वेवाहतूक बंद असते. मुंबईत जर नाइटलाइफ या नावाखाली नवे व्यवसाय सुरू होणार असतील, तर त्यांत सहभागी होणाऱ्यांना प्रवासाचे माध्यम म्हणून रेल्वे सोयीस्कर वाटते. दूरचे अंतर गाठणारी, स्वस्त व बरीच सुरक्षित रेल्वे रात्रीची ‘नाइटलाइफ लाइन’ ठरावी. सध्या रस्त्यांवरील टॅक्सी, रिक्षा यांच्याकडून रात्रीसाठी ठरवून दिलेल्या नियमांपेक्षा जादा भाडे वसूल केले जाते. रस्त्यांवर सुरक्षा नसते, खासकरून महिलांसाठी. अपघातसमयी मदतकार्यासाठी धावपळ करण्यासाठी शांत रस्त्यांवर नागरिकांची वर्दळ नसते. बाहेरगावाहून अपरात्री पोहोचणारे प्रवासी रात्रीच्या रेल्वे-विश्रांती काळात रेल्वे स्टेशनांवर खोळंबतात. यासारख्या बाबींवर अद्याप तोडगा नाही. ते नाइटलाइफच्या निमित्ताने वर्षभर प्रत्यक्षात यावेत या अपेक्षा आहेत. लोकल वाहतूक रात्रभर चालू राहिल्यास तिकीटघरे, लोकलचे इंडिकेटर्स, उद्घोषणा यंत्रणा रात्रभर चालू ठेवण्यासाठी रेल्वेला काही नियम बदलावे लागतील. रेल्वे स्टेशनजवळ राहणाºया रहिवाशांना रात्रभर घोषणा, लोकलच्या भोंग्यांच्या त्रासावर उपाय हवेत. रेल्वेमार्ग, स्टेशन्स येथील सुरक्षा रक्षकांची गस्त रात्रभर हवी. या सर्वांची अंमलबजावणी होण्याअगोदर यासाठी लागणारा खर्च करणे व्यवहार्य आहे किंवा नाही याचा अभ्यास करावा लागेल. रात्र सेवांचा फायदा नाममात्र प्रवाशांच्या सोयीसाठी असल्यास ती सेवा अव्यवहार्य ठरेल याचाही प्रशासनाबरोबर सर्व संबंधित इच्छुकांनी गंभीरपणे विचार करावा. - स्नेहा राज, गोरेगाव
यंत्रणेवर ताण येईल!
दिवसा काम व रात्री विश्रांती हा निसर्गाचा नियम आहे. ‘नाइटलाइफ’च्या नियोजित प्रस्तावामुळे मुंबई शहर रात्रभर जागे राहिल्यास लोकल वाहतूक नावाखाली येऊ घातलेला रात्रीचा धुमाकूळ हा समाजस्वास्थाच्या दृष्टीने कणभरही हिताचा नाही. पोलीस प्रशासनावर येणाºया ताणावर मार्ग कसा काढणार? पण काही मंडळींना नाइटलाइफ हवे, म्हणून संपूर्ण समाजाला वेठीस धरता? सर्वच यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात ताण जाणवत असताना सामान्य माणसांचे जनजीवन सुखात राखले जाईल का? नवीन नियम सामाजिक व्यवस्थेत धोक्याचा आहे. नेत्यांना अपेक्षित असलेले रात्रभर लोकल जीवन ही लोकांची गरज नाही. नव्याने राजकीय कारकिर्द सुरू करणाºया नेत्यांचे विचारही समाजाला घातक आहेत. - कमलाकर जाधव, बोरीवली
रात्रभर लोकल सेवा सुरू ठेवावी
मी तळोजा येथे एका खासगी कंपनीत नोकरी करीत आहे. माझे काम पाळीमध्ये असते. त्यामुळे जेव्हा दुपारची पाळी असेल. तेव्हा रात्री १२ पर्यंत डोंबिवलीला पोहोचतो. डोंबिवलीहून मुलुंडकडे जाण्यासाठी लोकलची वाट बघतो. जेव्हा लोकल उशिराने असतात तेव्हा मला शेवटची लोकल मिळते. मात्र जेव्हा लोकल वेळेवर असते तेव्हा माझी शेवटची लोकल सुटते. त्यामुळे रात्रभर लोकल सेवा सुरू ठेवावी.
- आकाश सोनावणे, मुलुंड
तांत्रिक बाबी लक्षात घेणे गरजेचे
पश्चिम रेल्वेचे उपनगरीय क्षेत्र हे चर्चगेट ते डहाणू असे आहे. विरारच्या पुढे डहाणूपर्यंत अप आणि डाउन असे दोनच रेल्वेमार्ग आहेत, त्यामुळे याच मार्गावरून लोकल, लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस आणि मालगाड्या धावत असतात. त्यामुळे हा रेल्वे मार्ग व्यस्त असतो. या तांत्रिक बाबी लक्षात घेता रात्रभर लोकल सेवा सुरू ठेवता येईल का, हा प्रश्न अनुत्तरित आहे. त्यामुळे रात्रभर लोकल सुरू न ठेवणे योग्य वाटते. - दयानंद पाटील, सचिव, डहाणू वैतरणा प्रवासी संस्था
शहराच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
लोकल सेवा रात्रभर सुरू ठेवण्याची मागणी अलीकडे होत आहे. त्याचवेळी मुंबईत नाइटलाइफ सुरू करण्याचा मानस आहे. हे सर्व लोकांच्या सोयीसाठी स्तुत्य आहे. परंतु उपनगरी रेल्वे स्थानकापासून घरी जाण्यासाठी उपयोजनेच काय? रिक्षा आणि टॅक्सी चालक हे लुटायला तयार असतात. रात्री बारानंतर रिटर्न भाडे आकारण्याच्या नावाने अव्वाच्या सव्वा भाडे आकारणे किंवा भाडेच नाकारणे असे प्रकार घडतात. मुंबईतील नाइटलाइफमुळे मुंबई शहर, उपनगर आणि लोकल सेवा प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येणार आहे. - अशोक पोहेकर, उल्हासनगर
रात्रभर लोकल सुरू ठेवणे ही आता काळाची गरज
मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या उपनगरी लोकलची वाहतूक रात्रभर सुरू ठेवणे, ही आता काळाची गरज झाली आहे. कारण चोवीस तास काम करणाºया बºयाच कंपन्या आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांना रात्रीसुद्धा प्रवास करावा लागतो. परंतु रात्रीच्या वेळेस लोकल नसल्याने प्रवाशांचे खूपच हाल होत असतात. त्यांना रात्री लोकल नसल्याचे फलाटावर उभे राहावे लागते. परंतु जर का रात्रीच्या वेळी लोकल सोडण्यात आल्या, तर प्रवाशांची होणारी गैरसोय नक्कीच दूर होईल. - पंकज ओसवाल, कर्जत
गर्दीचे नियोजन करा
मध्य रेल्वेच्या डोंबिवली स्थानकावर एकूण तीन पादचारी पूल आहेत. कल्याणच्या दिशेला असलेला जुना पादचारी पूल पाडून या ठिकाणी नवीन पूल बांधण्याचे काम सध्या सुरू आहे. यामुळे फलाटाच्या मधोमध असलेल्या एकाच पुलावर प्रवाशांची प्रचंड गर्दी होते. फलाट क्र. ३ व ४ वर एकाच वेळी दोन लोकल आल्यास पुलावर चढ-उतर करणाºया प्रवाशांच्या गर्दीला मर्यादा राहत नाही. यामध्ये ज्येष्ठ नागरिक, रुग्ण, अपंग व लहान बालकांचे फारच हाल होत आहेत. गर्दीतून वाट काढत फलाटावर पोहोचेपर्यंत अपेक्षित असलेली लोकल निघून जाते. खोपोली-कर्जतसारख्या लांब पल्ल्याच्या प्रवाशांना मागील लोकलसाठी ताटकळत उभे राहावे लागते. पुनर्बांधणीस घेतलेला पादचारी पूल केव्हा एकदा पूर्ण होतोय, याकडे सर्व प्रवाशांचे लक्ष लागले आहे. - मयूरेश कदम, वांगणी