मूत्रपिंड दानाच्या जनजागृतीसाठी प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 02:53 AM2017-08-19T02:53:31+5:302017-08-19T02:53:33+5:30
मूत्रपिंड दानाच्या जनजागृतीसाठी आणि अवयव दानाचे महत्त्व, याबाबत ‘स्प्रेडिंग होप’ या फाउंडेशनच्या माध्यमातून लॉर्ड विजय सज्ज झाले आहेत.
मुंबई : मूत्रपिंड दानाच्या जनजागृतीसाठी आणि अवयव दानाचे महत्त्व, याबाबत ‘स्प्रेडिंग होप’ या फाउंडेशनच्या माध्यमातून लॉर्ड विजय सज्ज झाले आहेत. लॉर्ड विजय यांना २०१३ मध्ये तीव्र मूत्रपिंड विकाराचे निदान झाले आणि २०१६ मध्ये त्यांना प्रत्यारोपण करावे लागले. मूत्रपिंड आजारपणाच्या गांभीर्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि १० लाख लोकांना अवयवदानाची प्रतिज्ञा करून जीव वाचविण्यासाठी, वाहनातून ‘चेन्नई ते लडाख’च्या प्रवासाला निघाले आहेत. चेन्नई ते लडाख हे ९ हजार किलोमीटर अंतर पार करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे.
परळ येथील केईएम रुग्णालयात शुक्रवारी सकाळी हा उपक्रम पार पडला. या अनोख्या उपक्रमाविषयी लॉर्ड विजय म्हणाले की, तीन वर्षांपेक्षा जास्त काळ या आजाराचा सामना करणे आणि अवयवदानाचा अनुभव घेणे हा वैयक्तिक आणि व्यावसायिकदृष्ट्या क्लेशदायक अनुभव होता. या गंभीर मूत्रपिंडाच्या आजारामुळे जीवनाकडे पाहण्याची दृष्टी बदलली आहे. त्यातूनच ‘स्प्रेडिंग होप’चा जन्म झाला. या विषयावर जनजागृती करण्यासाठी चेन्नईहून लडाखपर्यंत वाहनाने जाणार आहे.
या विषयी नेफ्रोलॉजिस्ट डॉ. अविनाश इग्नेशियस म्हणाले, दहापैकी एका भारतीयाला मूत्रपिंड विकाराचा धोका असतो, तर त्याच्या गांभीयार्बाबत जागरूकता कमी म्हणजे केवळ ७ टक्के आहे. आशियामध्ये जवळजवळ ३0 लाख लोक या आजाराने ग्रस्त आहेत, पण मुख्यत्वे जनजागृतीचा अभाव आणि न परवडण्याजोगे उपचार, यामुळे केवळ ३० टक्के लोकांना उपचार मिळतात. जागरूकता वाढल्याने जीवनशैली आणि उपचारांमध्ये लवकर बदल घडविता येतात. त्यामुळे क्रॉनिक किडनीच्या आजारांचा (सीकेडी) धोका कमी होऊ शकतो किंवा सीकेडी असलेल्या लोकांमध्ये वाढीचा धोका कमी होऊ शकतो.