‘ड्रीम सिटी’ पाहण्यासाठी केला कोलकाता ते मुंबई सायकल प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2019 01:47 AM2019-10-28T01:47:03+5:302019-10-28T06:16:59+5:30
चुकीचे बघून चुकीचे काही शिकू नका. जे योग्य आहे, ते शिका आणि दुसऱ्याला शिकवा
मुंबई : ‘ड्रीम सिटी’ पाहण्यासाठी एका अवलियाने तब्बल २ हजार किमी अंतर पार करून मुंबई गाठली. कोलकाता ते मुंबई अंतर सायकलने पार केले. आता मुंबईत येऊन आपले स्वप्न साकार करणार आहे. कोलकात्यातील न्यूटाइन येथे राहणारा २६ वर्षीय तन्मय दत्त असे या अवलियाचे नाव. दोन कपड्यांचे जोड, पाण्याची बाटली, मोबाइल आणि काही कागदी सामग्री घेऊन तन्मय न्यूटाइन येथून सायकलवरून २ आॅक्टोबर रोजी निघाला. सायकलवरून दररोज सरासरी ६० ते १०० किमीचे अंतर पार करत असे. प्रत्येक दिवशी पहाटे ४ वाजता सुरू केलेला प्रवास रात्री १२ वाजेपर्यंत करत होतो. मुंबईत २३ आॅक्टोबर रोजी दाखल झालो. प्रत्येक ठिकाणी अनेक लोक भेटत गेले. त्यांच्याशी गप्पा करून स्वत:ची माहिती सांगितली. त्यांनी मला खाण्यासाठी, राहण्यासाठी मदत केली, असे तन्मयने सांगितले.
पश्चिम बंगाल, झारखंड, छत्तीसगड अशी तीन राज्ये पार करून तन्मय महाराष्ट्रात दाखल झाला. काही ठिकाणी पावसाचा मारा, हत्तीचे हल्ले, सर्पाचे दर्शन, ट्रॅकचे अपघात, आरोग्याच्या समस्या सहन केल्या. प्रत्येक दिवशी रात्री झोपण्यासाठी हॉटेल, ढाबा, बस स्थानक याचा आधार घेत असे, असे त्याने सांगितले.
आता मुंबईच्या वातावरणाचा आनंद घेत आहे. मनाशी धरून आलेले स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. मला मुंबईतील एका व्यक्तीला भेटायचे आहे. त्याला भेटून सायकलने दिल्लीला जाणार आहे. त्यानंतर दिल्लीहून कोलकात्याकडे जाणार असल्याची योजना केली असल्याचे तन्मयने सांगितले.
कोलकाता ते मुंबई...
चुकीचे बघून चुकीचे काही शिकू नका. जे योग्य आहे, ते शिका आणि दुसऱ्याला शिकवा. यातूनच नवीन भारत तयार होईल, अशा आशयाचा फलक गळ्यात घालून सायकलने तन्मय दत्तने प्रवास केला आहे. तन्मय हा विक्री व्यवसायात काम करत होता. मात्र काही कारणांस्तव त्याने नोकरी सोडली. त्याच्या घरी पत्नी आणि मुले आहेत.