महाराष्ट्रासह देशात पुन्हा एकदा कोविड रुग्णांची संख्या वाढू लागली आहे, कोविडग्रस्तांचे मृत्यूही वाढू लागले आहेत. मुंबईच्या अनेक वॉर्डांत पुन्हा एकदा हॉटस्पॉट तयार होऊ लागले आहेत. मधल्या काळात मुंबई महापालिका प्रशासन कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंगवर खूप भर द्यायची. पण एका ठराविक पॉईंटनंतर आता मुंबईचेच नाही तर महाराष्ट्रातील कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग बंद आहे. पूर्वी महापालिकेची टीम कोरोना रुग्ण असलेल्या बिल्डिंगला, वस्तीला भेट देऊन पाहणी करायची. पण आता तसे काही घडताना दिसत नाही. भाजीविक्रेते फेरीवाले, हॉटेलवाले यांनी फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझरचा वापर करणे सोडून दिले आहे. प्रवासी लोकल, बस, रिक्षा, टॅक्सी, एस.टी, गावाकडे टमटम अशा वाहनातून दाटीवाटीने प्रवास करताना चित्र दिसत आहे. फिजिकल डिस्टन्सिंग राखणेच अशक्य, मास्क वापरायला सांगणे म्हणजे लोकांना अपमानास्पद वाटते. परिणामी आता पुन्हा एकदा कोविड केअर सेंटर रुग्णांनी भरायला सुरुवात झाली आहे, व्हेंटिलेटर, आयसीयूचे रुग्ण वाढत आहेत. पुन्हा एकदा रस्त्यावर रुग्णवाहिकीचे सायरन ऐकू येऊ लागले आहेत.
पूर्वीची कोरोनाची दहशत ही हळूहळू केसेस वाढूनही कमी व्हायला लागली आहे. लोक कोरोनाची फारशी चर्चा करीत नाहीत. आयसीयूमधील स्टाफही आता थोडासा मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या थकलेला जाणवू लागला आहे. आपण कितीही म्हटले की कोरोनाला हरवूया, कोरोनाला रोखले तरी खऱ्या अर्थाने कोरोनाने आपल्याला शारीरिक आर्थिक, सामाजिक दुर्बल बनवले. सर्वसाधारण श्रीमंतवर्ग हा गरीब झाला, त्यांनी आपापल्या धंद्यात बदल केला, स्टाफ कमी केला पण पुढचे दोन-तीन वर्षे उभारी घेऊ शकणार नाही असे गणित मांडून कर्जाच्या चक्रव्यूव्हात अडकला. फिजिकल डिस्टन्सिंग पाळता पाळता सामाजिक दुरावा वाढला. यापुढे कोरोना वाढू शकतो हे माहीत असूनही लोक गेट-टुगेदर करण्याचे विसरले नाहीत. उलट शक्कल लढवून पन्नास माणसांची नियमावली पाळून हळद, संगीत, लग्न, रिसेप्शन, पूजा असे कार्यक्रम राबवून लग्नाची हौस पूर्ण करून घेतली. त्याचबरोबर फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर वापरणे किंवा हात धुणे या त्रिसूत्रीला फाटा दिला. विनामास्क फिरणाऱ्या अशा लोकांना काय म्हणावे? आजही विमानतळावर फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझेनच्या नावाने बोंबच आहे. परदेशातून आलेले आणि पॉझिटिव्ह प्रवाशांचे हॉटेलमध्ये नामधारी विलगीकरण होत आहे. कोणीही त्यावर लक्ष ठेवत नाही.
पुन्हा कोरोना येण्याचे दुसरे कारण म्हणजे विमानतळावरील गलथानपणा. अगदी २५ जाने, २०२० ला झालेल्या पहिल्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत विमानतळावर काय चालते? तिथे परदेशातून आलेल्या पॅसेंजरला कशाप्रकारे तपासले जाते हे लक्षात आणून दिले होते, अगदी सामान वाहणारा लोडरही विनासंरक्षण काम करीत होता. त्याच्यामार्फत हा कोरोना विषाणू वस्त्यापर्यंत पोहचू शकतो. असे ९००हून अधिक लोडर्स आणि राज्य तसेच परदेशातून दररोज येणारे १५ ते २० हजार प्रवासी हे विषाणू पसरवू शकतात. कोरोनाचा वेगाने प्रादुर्भाव होत असताना सार्वजनिक शौचालये असलेल्या धारावी, वरळी, वर्सोवा येथे शौचकुपावर दररोज ३०० ते ५०० लोक बसतात. यातूनही कोरोनाचा वेगाने प्रसार झाला हे तज्ज्ञही नाकारणार नाहीत. म्हणूनच वर्सोवा येथे सॅनिटायझरचे ड्रम हे शौचकुपे स्वच्छ करण्यासाठी वापरले गेल्याने तो आटोक्यात आला.
लॉकडाऊनला लोकांनी खूपच दुषणे दिली. लॉकडाऊन हा खरा म्हणजे अभिशाप होता. लॉकडाऊनने खूप गोष्टी आपल्याला शिकविल्या. इतर देशांनी त्यांच्या फार्मा कंपन्या, सर्जिकल, मेडिकल साहित्य बनविणाऱ्या कंपन्या, व्हेंटिलेटर, रेस्पिरेटर बनवणारे व्यवसाय लॉकडाऊनच्या कक्षेच्या बाहेर काढले. लोकांना 'पॅक फूड' तयार ठेवले. मगच लॉकडाऊन जाहीर केला. लॉकडाऊन हा खरे म्हणजे एखाद्या महामारीच्या संकटाला तोंड देण्यासाठी असतो. म्हणजेच हॉस्पिटल व्यवस्था उभारणे, औषधे उपलब्ध करणे, मनुष्यबळ उपलब्ध करणे, लोकांसाठी नियमावली करणे, एकंदर उद्रेकाचा स्त्रोत पाहून तो रोखण्यासाठी जलमार्ग, हवाई मार्ग, रस्ते मार्ग बंद करून अन्य पर्यायांचा विचार करायला हवा. पण आपण असे न करता, काही वेळ न देता लोकल बंद केली. सार्वजनिक वाहतुकीची साधने बंद केली. आवश्यक उद्योगातील मनुष्यबळ ठेवण्यासाठी विशेष उपाययोजना केली नाही. आजारासाठी संशोधन यंत्रणा उभी करणे आपल्या देशात झाले नाही. त्यानंतर काही प्रमाणात डिसेंबरच्या आसपास काेरोना आवाक्यात आला.
सप्टेंबर २०२०मध्ये कोविड १९ च्या विषाणूचे नवनवीन अवतार यू.के., यू.एस. ए., साउथ आफ्रिका, ब्राझील येथे पसरले. पर्यटन सुरू होतच असताना ते घडल्याने पर्यटकांचा संयम सुटला. मालदीवसारखी छोटी पर्यटनस्थळे प्रकाशात आली. महाराष्ट्रातील लोणावळा, महाबळेश्वर, खंडाळा, इगतपुरी फुल झाली. दिवाळी मास्क बांधून साजरी झाली. त्यामानाने गणेशोत्सव आणि ईद हे २०२० मध्ये शांततेत गेले. विसर्जनावरही निर्बंध घातले गेले. कोकणातल्या लोकांनी बंदी जुगारून गणपतीसाठी गाव गाठले. रत्नागिरी, सिंधुदुर्गातील केसेस वाढल्या. पण पर्वा नव्हती. जानेवारी व फेब्रुवारी २०२१ मध्ये वाढल्या, आंदोलने, शेतकरी मोर्चा, ग्रामपंचायत निवडणुका तर सुरू होत्याच. तेथेही मास्कला हरताळ फासला गेला. फिजिकल डिस्टन्सिंगची व्याख्याच बदलली. सहा फुटांचे अंतर राखण्याऐवजी आपण खांद्याला खांदा लावून घोषणा देताना कोरोनाला अंगावर खेळवत होतो. अगदी जगातही हीच परिस्थिती होती. मास्कविरोधातल्या हाँगकाँगच्या आंदोलनापासून ते लॉकडाऊन विरोधातील आंदोलने ते ट्रम्पच्या कार्यकर्त्यांनी केलेले आंदोलन हे कशाचे द्योतक आहे. महामारीच्या विरोधात लढण्याचे की मृत्यू ओढवून घेण्याचे हे कळेनासे झाले आहे. जगातल्या या बेफिकिरीचा फटका प्रत्येक देशाने पाहिला. अजूनही आपण सुधारत नाही. देशातल्या, महाराष्ट्रातल्या, मुंबईतल्या नव्हे तर जगातल्या कोणत्याही भागातल्या ज्या कुटुंबाने कोविडचे फटके खाल्ले आहेत त्यांना वेदना माहीत आहेत. अनेक आयांनी आपला कमवता मुलगा गमावला, अनेकांनी कुटुंबाचा आधार गमावला. त्यानंतर पुन्हा अनलॉक सुरू झाल्यावर लोकांनी गर्दी करण्यास सुरू केली. लोकांनी पोटापाण्यासाठी रस्त्यावर धंदे मांडले, कंपन्या बंद पडल्याने भाजीविकणे पसंत केले. त्यातून नेस्को, बीकेसी, कांदरपाडा यासारख्या जम्बो कोविड केंद्रांत रुग्णांची संख्या वाढू लागली. टेस्टिंग कमी झाल्याने लोक मोकाट सुटले. मुंबई महापालिकेने आपली व्यूहरचना बदलली. पूर्वी कोरोनाबाधित रुग्ण आढळला की आरोग्य सेवक, वैद्यकीय अधिकारी यांची टीम त्याच्या घरी व्हिजिट द्यायची. फलक लागायचा. सोसायटी अध्यक्ष, सेक्रेटरीला कोरोना रुग्णाची काळजी कशी घ्यायची, लिफ्टसंबंधी. रुग्णाचा ओला-सुका कचऱ्याची कशी विल्हेवाट लावायची याच्या सूचना दिल्या जायच्या. वेळोवेळी तापाची नोंदही नोंद घेतली जायची. लगेच निर्जंतुकीकरण व्हायचे. कचरा गाडी घेऊन जायचे. कोविडची दहशत निर्माण होईल असे वातावरण असायचे. रुग्णासाठी रुग्णवाहिका पाठविली जायची. पण आता फक्त महापालिकेच्या शिक्षकांमार्फत फोन केला जातो. बाकी सर्व ऑल वेल असे समजूनच फॉलोअप घेतला जातो. रुग्ण हॉस्पिटलमध्ये गेल्यावर पुढे त्याचे काय होते अथवा तो घरी आल्यावरही फॉलोअप घेतला जात नाही. ही वस्तुस्थिती आहे. पोलीस कर्मचारी, आरोग्य अधिकारी सर्व दीर्घ महामारीने कंटाळले आहेत. यापुढे जर महामारी सुरू राहिली तर काय होणार या भीतीने जिवाला घोर लागला आहे. मुख्यमंत्री कोविडला थोपवण्यासाठी जिवाचे रान करताहेत, पण जनतेची खरी साथ मिळत नसल्याने भविष्यकाळात लॉकडाऊन येईल का, याचे उत्तर काळच देऊ शकेल.
-डॉ. दीपक सावंत, माजी आरोग्य मंत्री महाराष्ट्र शासन