मुंबई : वांद्रे ते वर्सोवा आणि नरिमन पॉइंट ते वरळी या मार्गावर सी-लिंक उभारणीची कामे प्रगतिपथावर असतानाच आता वर्सोव्याहून थेट विरारपर्यंत या सी-लिंकचा विस्तार करण्याचा निर्णय राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) घेतला आहे. राज्य शासनाच्या मंजुरीनंतर जेव्हा हे काम पूर्ण होईल तेव्हा नरिमन पॉइंट ते विरार हा प्रवास साडेतीन तासांऐवजी अवघ्या सव्वा ते दीड तासात पूर्ण करणे शक्य होणार आहे.
राज्य रस्ते विकास महामंडळाच्या संचालक मंडळाची बैठक नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी पार पडली. त्यात या महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारणीच्या प्रस्तावाला राज्य सरकारकडे पाठविण्यासाठी मान्यता देण्यात आली. राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविताना त्याच्या व्यवहार्यतेबाबतचे मुद्दे अधिक सविस्तरपणे सादर करण्याच्या सूचना एकनाथ शिंदे यांनी या वेळी दिल्या. वर्सोवा ते विरारपर्यंतच्या या सी-लिंकची लांबी ५२ किलोमीटर असेल. या कामाची व्यवहार्यता तपासण्यासाठी टीसीएस कंपनीची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या अहवालानुसार या कामासाठी सुमारे २२ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या मार्गावरून दररोज किमान दीड लाख वाहने धावतील. चार चाकी वाहनांसाठी ८०० रुपये तर अवजड वाहनांसाठी दीड हजार रुपये टोल आकारणी केल्यास प्रकल्प व्यवहार्य ठरेल, असे या वेळी सांगण्यात आले. वसई, भार्इंदर, दहिसर आणि बोरीवली अशा चार ठिकाणांहून सी-लिंकला प्रवेश दिला जाईल. सध्या अस्तित्वात असलेल्या रस्त्यांवरून विरार ते नरिमन पॉइंट हे ८२ किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी साडेतीन तास लागतात. सी-लिंकमुळे हे अंतर ६५ किलोमीटर होईल आणि ते सव्वा ते दीड तासात पूर्ण करता येईल.असा होणार विस्तारकोस्टल रोडवर मुंबई उच्च न्यायालयाने घातलेली बंदी सर्वोच्च न्यायालयाने उठवली आहे. त्यानंतर नरिमन पॉइंट ते वरळी या मार्गावरील कामाला सुरुवात झाली आहे. वरळी ते वांद्रे हा सी-लिंक सध्या अस्तित्वात आहे. तर, वांद्रे ते वर्सोवा या मार्गावरील कामही प्रगतिपथावरआहे. तिथून पुढे विरारपर्यंत सी-लिंकचा विस्तार केला जाईल.