Join us

सी लिंकवरचा प्रवास १ एप्रिलपासून महाग, टोलमध्ये होणार १५ रुपयांची वाढ 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2024 8:18 AM

आता पुढील तीन वर्षांसाठी म्हणजेच ३१ मार्च २०२७ पर्यंत नवे दर लागू राहतील, असे ‘एमएसआरडीसी’च्या अधिकाऱ्यांनी नमूद केले.

मुंबई : वांद्रे-वरळी राजीव गांधी सागरी सेतूवरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांच्या खिशाला १ एप्रिलपासून कात्री लागणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) पथकरात १५ रुपयांची वाढ केल्याने आता कारचालकांना १०० रुपये मोजावे लागणार आहेत, तर वांद्रे-वरळी सागरी सेतूवरून प्रवास करणाऱ्या मिनी बस किंवा तत्सम वाहनांना आता १६० रुपये पथकर भरावा लागणार आहे, तर ट्रक आणि बसला २१० रुपये पथकर द्यावा लागेल.

यापूर्वी या सागरी सेतूवरून प्रवास करणाऱ्या कार आणि जीपकडून ८५ रुपये, मिनी बसकडून १३० रुपये, तर ट्रक किंवा बसकडून १७५ रुपये पथकर आकारला जात होता. ‘एमएसआरडीसी’कडून दर तीन वर्षांनी या रस्त्यावरील पथकरात वाढ केली जाते. याआधी एप्रिल २०२१ मध्ये पथकरात वाढ करण्यात आली होती. आता पुढील तीन वर्षांसाठी म्हणजेच ३१ मार्च २०२७ पर्यंत नवे दर लागू राहतील, असे ‘एमएसआरडीसी’च्या अधिकाऱ्यांनी नमूद केले.

पासच्या दरांतही वाढपथकराच्या पासच्या दरांतही वाढ करण्यात आली आहे. मासिक पासाचे दर एकेरी प्रवासाच्या ५० पट राहणार आहेत, तर वारंवार प्रवास करणाऱ्या वाहनासाठी परतीच्या पासाचे आणि दैनिक पासाचे दर हे त्या वाहनाच्या एकेरी पथकाराच्या दराच्या अनुक्रमे दीड पट व अडीच पट असतील. 

कूपन्स खरेदीदारांना दिली जाईल सवलतपथकाराच्या ५० कुपन्सची आगाऊ खरेदी करणाऱ्या वाहन चालकाला पुस्तिकेच्या किमतीमध्ये १० टक्के सवलत दिली जाईल, तर पथकराच्या १०० कुपन्सची आगाऊ खरेदी करणाऱ्या वाहन चालकाला पुस्तिकेच्या किमतीमध्ये २० टक्के सवलत देण्यात येणार आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

खर्चापोटी ६.४९ टक्के रक्कम देणार‘एमएसआरडीसी’ने २००९ मध्ये हा मार्ग वाहतुकीसाठी खुला केला होता. ‘एमएसआरडीसी’ला वांद्रे-वरळी सागरी सेतूवरून २०३९ पर्यंत पथकर वसुली करता येणार आहे. सद्य:स्थितीत या मार्गावर पथकर वसुलीसाठी रोडवेज सोल्यूशन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला तीन वर्षांचे कंत्राट ‘एमएसआरडीसी’ने दिले आहे. त्यांच्याकडून ऑगस्ट २०२२ पासून पथकर वसुली सुरू आहे. कंत्राटानुसार कंपनीला पथकर वसुलीसाठी येणाऱ्या खर्चापोटी प्राप्त रकमेतून ६.४९ टक्के रक्कम दिली जाणार आहे.

टॅग्स :मुंबई