पश्चिमेसह पूर्व उपनगरांना जोडणाऱ्या मेट्रोमुळे प्रवास सुखकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2020 02:31 AM2020-01-01T02:31:59+5:302020-01-01T02:32:08+5:30
एमएमआरडीएचा दावा; प्रवाशांसाठी सुखकर प्रवासासह वेळेची बचत करणे होणार शक्य
- योगेश जंगम
मुंबई : समर्थनगर - जेव्हीएलआर - सीप्झ - कांजूर मार्ग या मेट्रो - ६ मार्गिकेच्या कामाला मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) वेग आला आहे. या मार्गिकेमुळे पश्चिम आणि पूर्व उपनगरांदरम्यानचा प्रवास सुखकर आणि जलद होणार असल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळेल.
मेट्रो - ६ ही मार्गिका दहिसर पश्चिम ते डी. एन.नगर मेट्रो - २ अ, अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व मेट्रो - ७, कुलाबा - वांद्रे - सीप्झ मेट्रो - ३ आणि वडाळा - घाटकोपर - मुलुंड - ठाणे मेट्रो -४ अशा चार मेट्रो मार्गिकांना छेदणार आहे. यासह पश्चिम उपनगरातील जोगेश्वरी स्थानक आणि पूर्व उपनगरातील कांजूर मार्ग रेल्वे स्थानक या दोन रेल्वे स्थानकांना मेट्रो - ६ मार्गिका छेदणार आहे. यामुळे या ठिकाणी मुंबईकरांना मार्ग बदलता येणार आहे. साहजिकच प्रवाशांचा वेळ वाचणार आहे.
मेट्रो - ६ ही मार्गिका १४.४७ कि.मी. लांबीच्या या मार्गिकेसाठी ६ हजार ७१३ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या मार्गिकेवर एकूण तेरा मेट्रो स्थानके असतील. यामध्ये स्वामी समर्थनगर, आदर्शनगर, मोमीननगर, जेव्हीएलआर, श्यामनगर, महाकाली गुंफा, सीप्झ गाव, साकीविहार रोड, रामबाग, पवई तलाव, आयआयटी पवई, कांजूर मार्ग, विक्रोळी पूर्व द्रुतगती महामार्ग अशी मेट्रो स्थानके असतील. जेव्हीएलआर येथे मेट्रो - ७, सीप्झ येथे मेट्रो - ३ला, इन्फिनिटी मॉलजवळ मेट्रो - २ अ तर कांजूर मार्ग येथे मेट्रो - ४ अशा चार मार्गिकांना जोडली जाणार आहे. यामुळे प्रवाशांचा प्रवास जलद होऊन चांगली कनेक्टिव्हिटीमुळे वेळेचीही बचत होणार आहे. यासह जोगेश्वरी आणि कांजूर मार्ग रेल्वे स्थानके जोडली गेल्याने, पश्चिम आणि पूर्व उपनगरांदरम्यानचा प्रवास जलद होणार आहे.
नवीन वर्षात या मार्गिकेचे काम एमएमआरडीए वेगाने करणार आहे. २०२१ सालापर्यंत या मार्गिकेचे काम पूर्ण करण्यात येईल.
या मेट्रो मार्गिकेवर बॅरिकेटिंगचे काम पूर्ण करण्यात आले असून, माती परीक्षण, युटिलिटी वर्क, पाइल कॅप वर्क, पिअर वर्क अशा विविध कामांना सुरुवात करण्यात आली असून, सिव्हिल वर्क आणि इतर कामांनाही लवकरच वेग येणार असल्याचे प्राधिकणातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
चार मेट्रो मार्गिकांना जोडणार
एमएमआरडीएकडून जेव्हीएलआर - सीप्झ - कांजूर मार्ग या मेट्रो - ६ मार्गिकेचे काम वेगाने सुरू आहे. या मार्गिकेमुळे पश्चिम आणि पूर्व उपनगरांदरम्यानचा प्रवास सुखाचा, तसेच जलद होईल. ही मार्गिका चार मेट्रो मार्गिकांना जोडणार असल्याने या मार्गिकेमुळे चांगली कनेक्टिव्हिटी मिळेल, असा एमएमआरडीएने स्पष्ट केले.