मुंबई - रेल्वेच्या कन्फर्म तिकिटावर आता रक्ताच्या नात्यातील इतर व्यक्तीला प्रवास करता येणार आहे. ‘किसी का तिकीट, किसी का सफर’ अशी टॅगलाइन रेल्वेने केली आहे. त्या अंतर्गत तिकीट आरक्षित करणाऱ्या व्यक्तीऐवजी कुटुंबातील रक्तातील नाते असणाऱ्या सदस्यांना रेल्वेतून प्रवास करता येईल. रेल्वेच्या आरक्षित तिकिटावर कुटुंबातील सदस्याचे नाव बदलून देण्यात येणार आहे.
काय आहे तिकीट हस्तांतरण? कन्फर्म आरक्षित तिकिटाची प्रिंट घेऊन काउंटरवर जावे लागते. तेथे कुटुंबातील ज्या व्यक्तीच्या नावे तिकीट बदलायचे आहे त्याचे आधारकार्ड, ओळखपत्राची झेरॉक्स, ज्यांच्या नावे तिकीट करायचे आहे त्याबाबत नातेसंबंधाचा पुरावा द्यावा लागणार आहे. त्यानंतर अपेक्षित बदल होईल. यासाठी ही प्रक्रिया रेल्वे धावण्याच्या २४ तास अगोदर करणे आवश्यक आहे.
पैसे वाया जाण्याचा धोका टळला -- रेल्वे विभागाच्या वतीने प्रवाशांसाठी तिकीट हस्तांतर योजना सुरू करण्यात आली आहे. - या संदर्भात जनजागृतीही केली जात आहे. या योजनेमुळे प्रवाशांना आरक्षित तिकिटावर कुटुंबातील सदस्याला प्रवास करता येणार आहे. त्यामुळे प्रवाशांचे पैसे वाया जाणार नाहीत. - याचा प्रवाशांना लाभ होणार असल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. - काही वेळा रेल्वेचे तिकीट कन्फर्म असूनही प्रवास रद्द करावा लागतो. अशा वेळी तिकिटाचे पैसे वाया जात होते. आता मात्र तसे होणार नाही.
कन्फर्म तिकिटावर ऐनवेळी जवळच्या नातेवाइकांना प्रवास करण्याची सुविधा रेल्वे प्रशासनाकडून उपलब्ध केली आहे. ही सुविधा उत्तम आहे. त्याचे स्वागतच करावे लागेल. - शुभम मोहिते, प्रवासी
आरक्षित तिकिटाचे रक्तातील नातेवाइकांना हस्तांतर केले जाते. त्यामध्ये आई, वडील, पत्नी, मुले, भाऊ, बहीण यांच्या नावावर तिकीट हस्तांतर करण्याची सुविधा रेल्वेने उपलब्ध करून दिली आहे. यामुळे पैसे वाया जाण्याचा धोका टळला. - संदीप शिर्के, प्रवासी