मुंबई : सिग्नल यंत्रणेबरोबरच विविध तांत्रिक कामे करण्यासाठी उपनगरीय रेल्वे वाहतुकीच्या मध्य, पश्चिम आणि हार्बर या तीनही मार्गांवर रविवारी, १६ जुलै रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवास जिकिरीचा होण्याची शक्यता असून, आवश्यकता असेल तरच प्रवाशांनी बाहेर पडावे.
हार्बर रेल्वे कुठे? : सीएसएमटी - चुनाभट्टी/वांद्रे अप आणि डाउन मार्गावर कधी? : ११.१० ते ४.४० वाजेपर्यंत परिणाम काय? : ब्लॉक कालावधीत सीएसएमटी/ वडाळा येथून वाशी/ बेलापूर/ पनवेलकरिता सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा आणि वांद्रे/ गोरेगाव येथून सीएसएमटीसाठी डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहणार आहे, तर पनवेल/ बेलापूर/ वाशी येथून सीएसएमटीकरिता सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/ वांद्रे येथून सीएसएमटी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. तथापि, ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. ८)दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.
पश्चिम रेल्वे कुठे? : बोरिवली - राममंदिर अप- डाउन जलद मार्गावर कधी? : सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत परिणाम काय? : ब्लॉक कालावधीत अंधेरी आणि बोरिवली रेल्वेस्थानकांदरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावरील सर्व सेवा धीम्यामार्गावर चालवल्या जातील. ब्लॉकदरम्यान काही उपनगरीय गाड्या रद्द राहतील, तर काही लोकल गाड्या बोरिवली आणि गोरेगावपर्यंत चालविल्या जाणार आहेत.
मध्य रेल्वे कुठे? : माटुंगा- ठाणे अप आणि डाउन धीम्या मार्गावर किती वाजता? : सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत परिणाम काय? : ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि ठाणे स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडूप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील. पुढे ठाणे स्थानकावर धीम्या मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील आणि नियोजित आगमनापेक्षा १५ मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील. ठाणे येथून अप धीम्या मार्गावरील लोकल ठाणे आणि माटुंगादरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल सेवा मुलुंड, भांडूप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव स्थानकावर थांबतील.