रेल्वेच्या टपावरील प्रवास प्रवाशांच्या अंगलट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 03:11 AM2018-09-13T03:11:36+5:302018-09-13T03:11:39+5:30
रेल्वेच्या छतावर प्रवास करताना ओव्हरहेड वायरचा शॉक लागून दर महिन्याला सरासरी दोन ते तीन मृत्यू होत असल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई : रेल्वेच्या छतावर प्रवास करताना ओव्हरहेड वायरचा शॉक लागून दर महिन्याला सरासरी दोन ते तीन मृत्यू होत असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या पाच वर्षांत मुंबईच्या उपनगरी रेल्वे सेवेदरम्यान तब्बल १४३ प्रवाशांना ओव्हरहेड वायरचा शॉक लागून जीव गमवावा लागला आहे.
आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी रेल्वे पोलीस आयुक्तांकडे ओव्हरहेड वायरचा शॉक लागून २०१३ ते २०१८ या कालावधीत झालेल्या मृत्यूंची माहिती ही माहितीच्या अधिकाराअंतर्गत मागितली होती. त्यात ही माहिती समोर आली आहे. शेख म्हणाले, रेल्वे डब्यातील गर्दी टाळण्यास किंवा कधी स्टंटबाजी करण्यासाठी काही प्रवासी रेल्वे टपावरून प्रवास करतात. मात्र या प्रवासात ओव्हरहेड वायरचा शॉक लागून गेल्या पाच वर्षांत तब्बल १४३ प्रवाशांचा मृत्यू तर १३८ प्रवासी जखमी झाले. त्यात सर्वाधिक मृत्यू हे चेंबूर व टिळकनगर स्थानकांदरम्यान झाले.
शेख यांनी सांगितले की, मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते कर्जत स्थानकांदरम्यान ओव्हरहेड वायरचा शॉक लागून एकूण ६७ प्रवाशांचा मृत्यू, तर एकूण ५२ प्रवासी जखमी झाले आहेत. पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते पालघर स्थानकांदरम्यान एकूण ४० प्रवाशांचा मृत्यू, तर एकूण ३१ प्रवासी जखमी झाले आहेत. तसेच हार्बर रेल्वेच्या सॅण्डहर्स्ट रोड ते पनवेल स्थानकांदरम्यान एकूण ३६ प्रवाशांचा मृत्यू आणि ३९ प्रवासी जखमी झाले.
>चेंबूर स्थानकात ११ प्रवाशांचा मृत्यू
चेंबूर स्थानकावर एकूण ११ प्रवाशांचा मृत्यू व ६ प्रवासी जखमी झाले आहेत. तर टिळकनगर स्थानकावर एकूण ५ प्रवाशांचा मृत्यू व १४ प्रवासी जखमी झाले आहेत.
हार्बर लाइनवर ट्रेनच्या कमी फेऱ्या आणि गोवंडी व चेंबूरदरम्यान होणारी स्टंटबाजी या दोन मुख्य कारणांमुळे या स्थानकांदरम्यान अधिक मृत्यू झाल्याची शक्यता शेख यांनी व्यक्त केली आहे.
यासंदर्भात रेल्वेमंत्री पीयूष गोयल आणि रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अश्वनी लोहानी यांस पत्र पाठवून हार्बर लाइनवरील गाड्यांच्या फेºया वाढविण्याची मागणी केल्याचे शकील अहमद शेख यांनी सांगितले.