मुंबई : मुंबईकर प्रवाशांना किफायतशीर सेवा देणाऱ्या बेस्ट उपक्रमाने गारेगार आणि आल्हाददायक प्रवास व्हावा, यासाठी लक्झरी गाड्यांच्या धर्तीवर प्रीमियम बससेवा सुरू केली आहे. या प्रीमियम सेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून रोज सात हजार प्रवासी त्यातून प्रवास करत आहेत. आल्हाददायक प्रवासाचा लाभ इतर प्रवाशांना घेता यावा, यासाठी बेस्ट उपक्रमाने पहिले दोन प्रवास ९० रुपयांत करण्याची संधी दिली असून ओला, उबर कॅबपेक्षा कमी दरात मुंबईकरांना प्रवास करता येणार आहे.
मुंबईकर प्रवाशांच्या सेवेसाठी दिवसरात्र धावणाऱ्या बेस्ट उपक्रमाने १२ डिसेंबरपासून प्रीमियम लक्झरी बससेवा सुरू केली. या सेवेला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक, वातानुकूलित प्रीमियम बस ठाणे ते बीकेसी, वांद्रे स्थानक पूर्व ते बीकेसी या मार्गावर दररोज धावत आहेत, तर या पाठोपाठ खारघर ते बीकेसी, बेलापूर ते बीकेसी, खारघर ते अंधेरी, बेलापूर ते अंधेरी, लोढा अमारा (ठाणे) ते अंधेरी, कुर्ला ते बीकेसी, गुंडवली ते बीकेसी आणि अंधेरी ते सीप्झ या आठ मार्गावर प्रीमियम बस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
नवीन प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी बेस्टने पहिले दोन प्रवास (बीकेसी ते खारघर) ९० रुपयांत करण्याची योजना आणली आहे. सध्या विविध मार्गावर ६० प्रीमियम बस धावत असून ही संख्या भविष्यात १०० इतकी होणार आहे.
पुशबॅक सीट्स, मोबाइल, लॅपटॉप चार्जिंगची सोयबेस्टच्या प्रीमियम बस या वातानुकूलित असून या बसमध्ये पुशबॅक सीट्स, मोबाइल आणि लॅपटॉप चार्ज करण्याची सोय आहे. याशिवाय दोन सीट्समधील अंतर जास्त असल्याने सुटसुटीत प्रवास करता येतो. याशिवाय चलो ॲपद्वारे हवी ती सीट आरक्षित करता येते व बसचे लाइव्ह लोकेशन कळते.