पश्चिम रेल्वेवरील प्रवास होणार सुसाट
By admin | Published: July 6, 2017 07:09 AM2017-07-06T07:09:50+5:302017-07-06T07:09:50+5:30
प्रवाशांच्या सोईसाठी पश्चिम रेल्वे लोकल सेवा अधिक जलद करण्याचा रेल्वे प्रशासनाने निर्णय घेतला आहे. पश्चिम रेल्वे ताफ्यातील
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : प्रवाशांच्या सोईसाठी पश्चिम रेल्वे लोकल सेवा अधिक जलद करण्याचा रेल्वे प्रशासनाने निर्णय घेतला आहे. पश्चिम रेल्वे ताफ्यातील बंबार्डियर लोकलची वेगमर्यादा ११० किमी प्रतितास करण्यात येणार आहे. सध्या सिमेन्स लोकलची वेगमर्यादा ८० किमी प्रतितास आहे. परिणामी, पश्चिम रेल्वेवरील प्रवांशाचा प्रवास अधिक सुसाट होणार आहे.
चर्चगेट ते विरार/ डहाणू स्थानकांपर्यंत धावणारी पश्चिम रेल्वेवर प्रवासी संख्या वाढत आहे. परिणामी, स्थानकांवरील गर्दी नियंत्रणासाठी लोकलच्या वेळेचेदेखील काटेकोरपणे पालन केले जाणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेच्या सूत्रांनी दिली. सध्या परेच्या ताफ्यात सिमेन्स आणि बंबार्डियर प्रकारातील लोकल आहेत. सिमेन्स लोकलची वेगमर्यादा ८०-१०० किमी प्रतितास आहे. ती वेगमर्यादा वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, बंबार्डियर लोकलची वेगमर्यादा ताशी ११० किलोमीटर करण्यात आली आहे.
बोरीवली-विरार/डहाणू या स्थानकादरम्यान लोकलचा वेग वाढवण्यात याव्या, अशा सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत. स्थानकाचा वेग वाढविल्यास दोन स्थानकांतील अंतरात १ ते २ मिनिटांनी फरक पडेल. त्याचबरोबर, भविष्यात पश्चिम रेल्वेवर अधिक लोकल सेवा सुरू करण्याचा मार्गदेखील मोकळा होईल. नव्याने दाखल होणाऱ्या आणि आधुनिक ब्रेक यंत्रणेने सुसज्ज अशा लोकलची वेगमर्यादा ही ताशी १३० किमी प्रतितास असणार आहे. त्यामुळे या निर्णयाचा फायदा नव्या लोकललादेखील होणार आहे, अशी माहिती परेच्या सूत्रांनी दिली.
आॅक्टोबरपासून ‘परे’चे नवे वेळापत्रक
पश्चिम रेल्वेवरील स्थानकांवर गर्दी नियंत्रणासाठी पश्चिम रेल्वेचे नवे वेळापत्रक जाहीर करणार आहे. त्यात लोकल फेऱ्या वाढविण्यात येणार आहेत. त्याचबरोबर, वातानुकूलित लोकलची चाचणीदेखील सकारात्मक होत असल्याने, लवकरच एसी लोकलदेखील प्रवाशांच्या सेवेत येणार आहे.