लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क घालणे बंधनकारक केले आहे. अनेक प्रवासी विनामास्क प्रवास करताना आढळून येत आहेत. भारतीय रेल्वेने देशातील रेल्वेस्थानकांवर प्रवाशांनी मास्क घालावा, यासाठी कडक पाऊल उचलत आहे. १७ एप्रिलपासून भारतीय रेल्वेच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. याद्वारे मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाने १९ ऑगस्टपर्यंत १०,८९४ विनामास्क प्रवाशांकडून १७ लाख ९८ हजार ९०० रुपयांची दंडवसुली केली आहे.
रेल्वे परिसरात किंवा रेल्वेत विनामास्क प्रवासी आढळून आल्यास अथवा कुठेही थुंकण्यामुळे रेल्वे परिसरात अस्वच्छता पसरेल. नागरिकांना विविध आजारांची लागण होऊ शकते. कोरोनाकाळात अस्वच्छता पसरविल्यास कोरोनाचा संसर्गही होऊ शकतो. रेल्वे परिसर अथवा रेल्वेत असताना विनामास्क सापडल्यास ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. रेल्वेस्थानक परिसर अथवा रेल्वेत थुंकून परिसर अस्वच्छ केल्यासही ५०० रुपये दंड भरावा लागत आहे. मध्य रेल्वेने १७ एप्रिल ते १९ ऑगस्टपर्यंत विनामास्क असलेल्या १९१६ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून ३ लाख ७१ हजार रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
तर पश्चिम रेल्वेने १७ एप्रिल ते १९ ऑगस्टपर्यंत विनामास्क असलेल्या ८९७८ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून १४ लाख २१ हजार ९०० रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.