Join us

प्रवासी ऑन मास्क; मात्र लोकल गर्दी कायम...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2021 4:06 AM

मुंबई : मिनी लॉकडाऊनमध्ये लागू करण्यात आलेल्या विविध निर्बंधांत लोकलच्या गर्दीत प्रवासी ऑन मास्क आले; मात्र गर्दी कायम होती. ...

मुंबई : मिनी लॉकडाऊनमध्ये लागू करण्यात आलेल्या विविध निर्बंधांत लोकलच्या गर्दीत प्रवासी ऑन मास्क आले; मात्र गर्दी कायम होती. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण आणा, असा सूरही जोर धरू लागला आहे.

ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये दुपारच्या सुमारासही गर्दी पाहावयास मिळाली. या निर्बंधांनंतर विनामास्क प्रवाशांचे प्रमाण कमी दिसले. त्यात प्रत्येक स्थानकावर रेल्वे पोलिसांकडून डब्यातील प्रवाशांनी मास्क घातला की नाही याची पाहणी घेत फोटो घेणे सुरू होते. त्यात पोलिसांना पाहून मास्क न घातलेल्यांच्या चेहऱ्यावरही मास्क चढला. त्यात, कल्याण, डोंबिवली, ठाणे, मुलुंड स्थानकात गर्दी वाढताना दिसली.

तर दुसरीकडे लहान मुलांकडे पालक दुर्लक्ष करताना दिसले. काही महिला लहान बाळासह लोकलमध्ये चढल्या. यात मुलांच्या चेहऱ्यावर मास्क पाहावयास मिळाला नाही.

शासनाने सामान्यांसाठी लोकल सेवा बंद न करता गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी महिला प्रवाशांकडून करण्यात आली. त्यात हातावर पोट असणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांचाही विचार व्हावा असेही काही महिला प्रवाशांनी सांगितले.