सुरक्षा कर्मचाऱ्यांनी काढला चप्पलचा सोल; विमानतळावर सोनं तस्करीची पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2019 12:52 PM2019-04-05T12:52:15+5:302019-04-05T13:24:24+5:30

विमानतळावर सोन्याची तस्करी करताना पकडले जाऊ नये यासाठी वेगवेगळी शक्कल लढवली जाते. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका प्रवाशाने असाच एक कारनामा केला आहे.

traveler at mumbai airport had hidden 11 lakh rupee gold in slippers | सुरक्षा कर्मचाऱ्यांनी काढला चप्पलचा सोल; विमानतळावर सोनं तस्करीची पोलखोल

सुरक्षा कर्मचाऱ्यांनी काढला चप्पलचा सोल; विमानतळावर सोनं तस्करीची पोलखोल

Next
ठळक मुद्देप्रवाशाने आपल्या चप्पलमध्ये तब्बल 11 लाख किंमतीचे सोने लपवले होते. मात्र विमानतळावरील अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हा प्रवाशाला पकडण्यात यश आले आहे.सीआयएसएफने प्रवाशाकडून चप्पलमध्ये लपवलेले सुमारे 11 लाख किंमतीचे 381 ग्रॅम सोने विमानतळावर जप्त केले.चप्पलच्या सोलमध्ये 381 ग्रॅम वजनाची दोन सोन्याची बिस्किटं सापडली.

मुंबई : विमानतळावर सोन्याची तस्करी करताना पकडले जाऊ नये यासाठी वेगवेगळी शक्कल लढवली जाते. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका प्रवाशाने असाच एक कारनामा केला आहे. प्रवाशाने आपल्या चप्पलमध्ये तब्बल 11 लाख किंमतीचे सोने लपवले होते. मात्र विमानतळावरील अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हा प्रवाशाला पकडण्यात यश आले आहे. सीआयएसएफने प्रवाशाकडून चप्पलमध्ये लपवलेले सुमारे 11 लाख किंमतीचे 381 ग्रॅम सोने विमानतळावर जप्त केले आहे.

राहत अली असं या प्रवाशाचं नाव असून तो बहरीनहून मुंबईला आला होता. त्यानंतर तो विस्तारा एअसलाईन्सच्या विमानाने दिल्लीला जाण्याच्या तयारीत होता. मात्र त्याच दरम्यान त्याच्या काही हालचाली संशयास्पद वाटल्याने त्याची अधिक चौकशी केली असता सोन्याच्या तस्करीचे प्रकरण समोर आले आहे. सीआयएसएफ प्रवक्ते हेमेंद्र सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, राहत अली दिल्लीला जाण्याच्या तयारीत असताना त्याची तपासणी करण्यात आली. त्यावेळी त्याच्या चप्पलच्या सोलमध्ये 381 ग्रॅम वजनाची दोन सोन्याची बिस्किटं सापडली. या सोन्याची किंमत 11,12,139 रुपये आहे. सीआयएसएफने हे सोनं जप्त केलं आहे. 


मुंबई विमानतळावर वर्षभरात केले 509 किलो सोने जप्त

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सीमाशुल्क विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटने (एआययू) वर्षभरात तब्बल 139 कोटी रुपये किमतीचे 509 किलो सोने जप्त केले होते. तर, 10 कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. सीमाशुल्क विभागाच्या आयुक्त व्ही. रमा मॅथ्यू यांच्या मार्गदर्शनाखाली एआययू युनिटतर्फे ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती सीमाशुल्क विभागाच्या सूत्रांनी दिली होती.

दुबई व इतर आखाती देशांतून येणाऱ्या विमानांमधील प्रवासी सोन्याची आयात करताना त्याचे सीमाशुल्क भरण्यास टाळाटाळ करतात. यासाठी विविध क्लृप्त्या अवलंबून सोने तस्करी केली जाते. कधी कपड्यांमध्ये, कधी चप्पल, बूट, मोबाइल कव्हर, कधी आणखी कशाचा वापर करून सोने व अमली पदार्थ लपवून आणले जातात. अनेकदा सोने बिस्किटाच्या रूपात आणले जाते. एआययू युनिटला मिळालेल्या खात्रीशीर माहितीनंतर अशा प्रवाशांवर पाळत ठेवली जाते व त्यांच्याकडील सोने, चांदी, अमली पदार्थ जप्त केले जातात व त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवून त्यांच्या विरोधात भारतीय सीमाशुल्क कायदा 1962 अन्वये कारवाई केली जाते.

परदेशी महिलेने अंर्तवस्त्रात लपवलं होतं दीड किलो सोनं, अधिकाऱ्यांनी हाणून पाडला तिचा प्लॅन!

चेन्नई विमानतळावर काही दिवसांपूर्वी सोन्याची तस्करी करणाऱ्या एका महिलेला अटक करण्यात आली होती. 29 मार्च 2019 रोजी एक महिला परदेशातून भारतात परतली होती. मूळची थायलँड असणारी क्रायसॉर्न थामप्राकोप नावाच्या या महिलेला कस्टम अधिकाऱ्यांनी अटक केली होती. क्रायसॉर्न मोठ्या शिताफीने दीड किलो सोन्याची तस्करी करत होती. पण तिचा हा प्रयत्न अपयशी ठरला. पार्किंगच्या सीमेजवळ सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी क्रायसॉर्नला थांबवलं तेव्हा तिला धक्का बसला. आधी क्रायसॉर्नने चलाखी करण्याचा प्रयत्न केला. पण जेव्हा तिची झडती घेण्यात आली तेव्हा अधिकारीही हैराण झाले. क्रायसॉर्नने तिच्या ब्रामध्ये साधारण दीड किलो सोनं लपवलं होतं. या सोन्याची किंमत साधारण 47 लाख रूपयांच्या आसपास आहे. सोबतच कस्टम अधिकाऱ्यांनी त्या व्यक्तीला सुद्धा अटक केली ज्याला क्रायसॉर्न सोनं देणार होती. 

 

Web Title: traveler at mumbai airport had hidden 11 lakh rupee gold in slippers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.