प्रवासी कट्टा: रेल्वेने ‘अपडेट’ होणे गरजेचे!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2019 01:41 AM2019-06-06T01:41:43+5:302019-06-06T06:27:05+5:30

परदेशात रेल्वे मार्गाच्या देखभाल-दुरुस्तीसाठी वापरण्यात येणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर करून रेल्वे तंत्रज्ञानाच्या दृष्टीने ‘अपडेट’ होणे गरजेचे आहे, असे मत ‘लोकमत’च्या वाचकांनी ‘प्रवासी कट्ट्या’च्या व्यासपीठावर व्यक्त केले. त्यातील निवडक प्रतिक्रिया..

Traveler needs to be 'updated' by rail! | प्रवासी कट्टा: रेल्वेने ‘अपडेट’ होणे गरजेचे!

प्रवासी कट्टा: रेल्वेने ‘अपडेट’ होणे गरजेचे!

Next

कुर्ला आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान अलीकडेच लोकलचे चाक घसरून दुर्घटना घडली. पावसाळ्यापूर्वीच्या उपाययोजना सुरू असताना, दुरुस्ती-देखभालीच्या कामांसाठी दर आठवड्याला मेगाब्लॉक, पॉवरब्लॉक, विशेष ब्लॉक घेतले जात असतानाही अशा घटना घडतच आहेत. त्या टाळण्यासाठी रेल्वेनेरेल्वे रूळ, ओव्हरहेड वायर यांची तपासणी तसेच रुळालगतच्या नाल्यांच्या सफाईची कामे नियमित करावीत. परदेशात रेल्वे मार्गाच्या देखभाल-दुरुस्तीसाठी वापरण्यात येणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर करून रेल्वे तंत्रज्ञानाच्या दृष्टीने ‘अपडेट’ होणे गरजेचे आहे, असे मत ‘लोकमत’च्या वाचकांनी ‘प्रवासी कट्ट्या’च्या व्यासपीठावर व्यक्त केले. त्यातील निवडक प्रतिक्रिया...

उपाययोजनांनंतरही सदैव तत्पर राहावे
गाड्यांची आणि प्रवाशांची सुरक्षा, वेळापत्रक सांभाळणे; शिवाय तांत्रिक बाबी सांभाळतानाच खोळंबा न होता लोकल सेवा सुरक्षित ठेवणे, ही एक दररोजची परीक्षा असते. पावसाळ्यात मोठा पाऊस पडल्यास रेल्वेचा वेग मंदावतो. त्यामुळे रेल्वेचे वेळापत्रक पूर्णत: कोलमडून जाते. मान्सून काळात प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत पावसाचे पाणी साचण्याच्या ठिकाणांवरही लक्ष ठेवून त्याद्वारे नियोजन करण्यासाठी आता या ठिकाणी ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे या ठिकाणी रेल्वे कर्मचारी, सुरक्षा विभाग आणि आधुनिक यंत्रणेचा वापर करून एप्रिलपासून सुरू केलेली कामे मे अखेरीपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट मध्य रेल्वे प्रशासनाने ठेवले असून आतापर्यंत ७० ते ८० टक्के कामे पूर्ण करण्यात आली आहेत. सिग्नल यंत्रणा आणि ओव्हर हेड वायरची दुरुस्ती करणे, रेल्वे रुळांची स्वच्छता करणे तसेच रेल्वे मार्गाची कामे हाती घेण्यात आली आहेत. पण लोकल प्रवास विनाअडथळा, वेळेवर व्हावा याकडे सदैव तत्परतेने लक्ष द्यावे. - कमलाकर जाधव, बोरीवली (पूर्व )

पावसाळ्याआधी रेल्वे खरेच तयार आहे?
रस्तेसफाई, नालेसफाई, रेल्वे पूल तपासणी, रेल्वे ओव्हरहेड वायर, इलेक्ट्रिक पोल तपासणी, रेल्वे ट्रॅक तपासणीबरोबरच रेल्वे मार्गानजीकच्या सांडपाणी वाहिन्यांची दरवर्षी साफसफाई होत असताना, पावसाळ्यापूर्वी आणि ऐन पावसाळ्यात रेल्वे रुळांवर पाणी साचते. दरवर्षी सफाईवर कोट्यवधी रुपये खर्च केले जातात तरीही पावसाळ्यात पाणी साचण्याच्या घटना होतात. रेल्वे ट्रॅकपासून १०-१५ फूट लांब अंतरावर १० फूट उंचीची सिमेंट-काँक्रिट भिंत उभारावी; तसेच नजीकच्या झोपडपट्टीतून सोडलेले सांडपाणी रेल्वे रुळावर येणार नाही अशी तरतूद करावी. दर ३००-४०० मीटर अंतरावर सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत़ रेल्वेच्या विजेची चोरी करणाºया समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी़ (ओव्हरहेड विद्युतप्रवाह खंडित होण्याचे हे एक कारण होऊ शकते़) रेल्वे कर्मचारी झोपडीवासीयांच्या संपर्कात असतील अशांना स्थलांतरित करावे़ नवीन अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांना तत्काळ अटकाव करावा.
- गुरुनाथ खताते, खांदा कॉलनी, नवीन पनवेल

रेल्वेची संपूर्ण यंत्रणा सक्षम करणे गरजेचे
मुंबई उपनगरीय रेल्वेच्या पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गावर रूळ, ओव्हरहेड वायर, सिग्नल यासह अन्य तांत्रिक कामांच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी दर रविवारी नियमित मेगाब्लॉक घेतला जातो. मात्र मेगाब्लॉक घेऊनही वारंवार छोटेमोठे अपघात होऊन या ना त्या कारणाने रोजच रेल्वे वाहतूक विस्कळीत होते. नुकतेच मध्य रेल्वेच्या कुर्ला स्थानकावर लोकलच्या एका डब्याचे चाक रुळावरून घसरले आणि ऐन गर्दीच्या वेळी वाहतूक विस्कळीत झाली. आता पावसाळा तोंडावर आला आहे. मुंबईची बहुतांशी जमीन सखल असल्याने पावसाळ्यात रुळांवर पाणी साचते व रेल्वे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. यासाठी नालेसफाई करणे, रुळांमध्ये नवीन खडी टाकणे आदी कामे रेल्वेतर्फे केली जातात. पण त्यातून फारसे काही निष्पन्न होत नाही. रेल्वे प्रशासनाने पावसाळ्याअगोदर युद्धपातळीवर ही कामे केली पाहिजेत. दुसरी गोष्ट म्हणजे रेल्वे रुळांच्या देखभालीवर प्राधान्याने लक्ष ठेवले पाहिजे. अतिवृष्टीसारख्या नैसर्गिक आपत्तीवर आपले नियंत्रण नसले तरी रेल्वेची संपूर्ण यंत्रणा आपण अधिकाधिक सक्षम करू शकतो. - प्रदीप शंकर मोरे, अंधेरी

मेगाब्लॉकनंतरही दुखणे कायम
रेल्वे प्रशासनाकडून आधुनिकता व सुरक्षितता यांचे प्रयत्न होत आहेत, हे स्तुत्य आहे. परंतु त्यांचे उपक्रम प्रवाशांच्या सोयीपेक्षा प्रशासनाच्या मनाप्रमाणे राबविलेले असल्यामुळे अजूनपर्यंत प्रवाशांच्या हालअपेष्टा कमी झालेल्या नाहीत. बारा महिने रविवारी मेगाब्लॉक, पॉवरब्लॉक, याशिवाय विशेष ब्लॉक घेतले जातात. तरी तांत्रिक बिघाड, पॉइंट फेल इत्यादी कारणास्तव प्रवासी हैराण होत असतात. त्यामुळे उपकरणांची योग्य देखभाल नियमित होत नाही, असे दिसून येते. साप्ताहिक मेगाब्लॉकशिवाय आणखी काही देखभाल करायला हवी हे रेल्वे अधिकाºयांनी लक्षात घेतले पाहिजे. गाड्यांच्या क्षमतेपेक्षा वाढलेली प्रवासीसंख्या यांची जाण असूनही कालबाह्य झालेल्या उपाययोजना प्रथमत: बदलण्याची गरज आहे. पावसाळ्यापूर्वी लोहमार्ग परिसरातील उघडी गटारे, नाले स्वच्छ केले जातात; तरीही पाणी तुंबून काही काळ रेल्वेगाड्या बंद पडतात. मग ही साफसफाई खरोखर होते का? पुन्हा त्या साफसफाईवर झालेला खर्च आणि वेळ व्यर्थ जातो त्याला जबाबदार असणाºया सर्वांवर कारवाई होत नाही; ती करावी. लोकल ९ ऐवजी आता १२ आणि १५ डब्यांच्या धावायला लागल्यात तेव्हा त्याखालचे रूळ, खडी, जमीन यांची होणारी झीज वेळोवेळी तपासून त्यावर आवश्यक त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. ही सर्व कामे नियमित होतात की नाही याची तपासणी करण्यास एखादे खाते असावे जे जबाबदारीने आपले काम पार पाडील. गाड्या व लोहमार्ग यांची परदेशात कशा प्रकारे निगा राखली जाते याचा अभ्यास करून त्यापैकी योग्य त्या पद्धतींचा अवलंब आपल्या येथेही केला जावा. फक्त अपघात झाल्यावर खडबडून जागे व्हायचे ही प्रवृत्ती कायमची सोडून दुर्घटना होऊ नयेत म्हणून रेल्वे प्रशासन सदैव जागरूक असायला हवे. - राजन पांजरी, जोगेश्वरी.

सुरक्षित प्रवास रेल्वेची जबाबदारी
ऐन पावसाळ्यात प्रवाशांना त्रास होणार नाही, यादृष्टीने रेल्वे प्रशासनाने काम करायला हवे. प्रवासीसंख्या दिवसेंदिवस वाढत असताना रेल्वे प्रशासन अपडेट व्हायला तयार नाही. त्यामुळे सर्व समस्या अजूनही तशाच आहेत. प्रवाशांना मात्र त्याचा त्रास होत आहे. पावसाळ्यात रेल्वेचा प्रवास सुरक्षित व्हायला हवा. ही रेल्वेची जबाबदारी आहे. निदान या वर्षी तरी रेल्वेच्या समस्यांमुळे प्रवाशांना त्रास नको.
- उदय वाघवणकर, जोगेश्वरी (पूर्व)

ठोस पावले उचलणे आवश्यक
लोकल म्हणजे मुंबईची लाइफलाइन आहे. परंतु प्रत्येक पावसाळ्यात मात्र या लोकलची तारांबळ उडते. रेल्वे वाहतूक सुरळीत चालावी यासाठी रेल्वे प्रशासनाने लोकलमध्ये सुधारणा केल्या आहेत. या सुविधा निश्चित चांगल्या आहेत. पण रेल्वे वाहतूक पावसाळ्यात खोळंबण्याचे मुख्य कारण रेल्वे रुळांमध्ये पाणी साचणे. रेल्वे प्रशासनाने रेल्वे रुळांतून पाण्याचा निचरा योग्य रीतीने व्हावा यासाठी ठोस पावले उचलून त्यात सुधारणा केल्या पाहिजेत. - कमलेश उबाळे, कल्याण (पू.)



रेल्वेला रुळावर आणणे आवश्यक
मुंबई उपनगरातील लाखो प्रवाशांची जीवनवाहिनी असणाºया उपनगरीय प्रवाशांना काही ना काही कारणाने रेल्वेच्या विस्कळीतपणाचा मनस्ताप नेहमीच सहन करावा लागतो. पावसाळ्यात तर हा त्रास तर ठरलेलाच आहे. जुने झालेले रूळ बदलण्याची गरज आहे. तसेच अनेक वेळेला सिग्नल यंत्रणा नादुरुस्त का होत राहते हे अनाकलनीय आहे. नवीन अतिरिक्त मार्गिकांचे काम तर मागील दहा वर्षांपासून अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे. ते लवकरात लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे. आता नवीन लोकल असल्याने पावसाळ्यात पाणी साचल्याने इंजीन बंद पडण्याचे प्रमाण कमी झाले असले तरी, लोकलचा खोळंबा होतच असतो. वेळापत्रक तर केवळ कागदावरच राहते. रेल्वेची ही परिस्थिती बदलण्यासाठी आमूलाग्र बदल करणे आवश्यक आहे. नवीन रेल्वेमंत्री पीयूष गोयल हे मुंबईचे आहेत, त्यांनी रेल्वेला व्यवस्थित रुळावर आणण्याची गरज आहे. - अनंत बोरसे, शहापूर

मेगाब्लॉक घेऊनही समस्या
मेगाब्लॉक, पॉवरब्लॉक, विशेष मेगाब्लॉक अशा विविध नावाने मध्य, हार्बर व पश्चिम रेल्वेवर तांत्रिक दुरुस्तीच्या नावाने दर आठवड्याला ब्लॉक घेतला जातो. तरीही अडथळा किंवा तांत्रिक बिघाडामुळे रेल्वे सेवा खंडित होते, रेल्वेचा बोजवारा उडतो. पावसाळ्यात रेल्वे मार्गात पाणी साचून लोकल बंद पडण्याचा आणखी एक प्रकार वाढतो. रेल्वे मार्गातील गटारे तुंबत असल्याने अनेक रेल्वे स्थानकांतील रूळांवर पाणी साचते. या वर्षी रेल्वे मार्गातील गटारांची पूर्ण साफसफाई झाल्याने गाड्या बंद पडणार नाहीत हा रेल्वेचा दरवर्षीचा दावाही काही दिवसांतच मोडीत निघतो. या वर्षीही काही वेगळे चित्र असेल असे वाटत नाही. केंद्राला सर्वाधिक महसूल मुंबई उपनगरी सेवेतून मिळतो; अशावेळी या प्रवाशांच्या जीविताची व सुखकर प्रवासाची काळजी घेणे ही रेल्वेची जबाबदारी आहे. तसेच मेगाब्लॉकचे काम यापुढे आधुनिक तंत्रज्ञान वापरून केले जायला हवे. - मुरलीधर धंबा, डोंबिवली (प.)

प्रत्येक दुर्घटनेतून प्रशासनाने काहीतरी शिकावे
एक दुर्घटना टळली यावरून बोध घेत नियमित मेगाब्लॉक, पॉवरब्लॉक, विशेष ब्लॉक हे अत्यंत कडक देखरेखीखाली व्हावेत. त्याकरिता काही व्यक्ती, खाती यांच्यावर ही जबाबदारी सोपवावी. जुन्या लोकलमध्ये नाममात्र बदल घडवून त्या नवीन नावांनी चालविण्यापेक्षा डब्यांची रचना व मजबुती यांची प्रथम चाचणी घेतल्यावरच ते डबे प्रवासासाठी वापरात आणावेत. वाढलेल्या प्रवाशांमुळे गाड्यांच्या फेऱ्या वाढल्या आहेत. डब्यांबरोबर लोहमार्गाची झीज होत असते हे लक्षात घेऊन त्यांच्या नेहमीच तपासण्या कराव्यात. काही कडक निकष लावून रुळांची व त्याखालील जमिनीची वेळोवेळी तपासणी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करावी. पावसाच्या पाण्याने जमीन खचू शकते म्हणून त्यावर लक्ष ठेवणारी सुरक्षा यंत्रणा दिवसरात्र राबवावी. पावसाळ्यात वेधशाळेकडून वर्तविल्या जाणाºया पावसाच्या अंदाजांची नोंद घेऊन त्याप्रमाणे पुढील कृतींसाठी तयारी ठेवावी. बरेचदा स्थानिक रेल्वे अधिकारीवर्ग आपल्या प्रवासी वाहतुकीसंबंधी खºयाखुºया अडचणी प्रवाशांपुढे स्पष्ट मांडण्याऐवजी स्वत:च गायब होऊन प्रवाशांचा रोष ओढवून गोंधळाची परिस्थिती निर्माण करतात. याकरिता प्रवाशांशी संबंध येणाºया कर्मचारी व अधिकारी वर्गाला जनसंपर्क या विषयाशी निगडित प्रशिक्षण देणे अत्यावश्यक आहे. - स्नेहा राज, गोरेगाव

Web Title: Traveler needs to be 'updated' by rail!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे