Join us  

प्रवासीच निघाला ठग; ६ हजार ७०० रुपयांसह दुचाकी घेऊन काढला पळ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2019 5:27 AM

साकिनाका येथे प्रवासीच ठग निघाल्याने रिक्षाचालकाला पोलीस ठाणे गाठण्याची वेळ आली. कमी किमतीत मोबाइल विकत घेऊन देण्याचे आमिष दाखवून रिक्षाचालकाचे ६ हजार ७०० रुपयांसह त्याची दुचाकी घेऊन प्रवाशाने पळ काढला.

मुंबई : साकिनाका येथे प्रवासीच ठग निघाल्याने रिक्षाचालकाला पोलीस ठाणे गाठण्याची वेळ आली. कमी किमतीत मोबाइल विकत घेऊन देण्याचे आमिष दाखवून रिक्षाचालकाचे ६ हजार ७०० रुपयांसह त्याची दुचाकी घेऊन प्रवाशाने पळ काढला. या प्रकरणी साकिनाका पोलीस अधिक तपास करीत आहेत.तक्रारदार रिक्षाचालक अल्ताफ मेहमुद शेख (२०) हे साकिनाका परिसरात राहतात. शेख यांच्या तक्रारीनुसार, साकिनाका येथे असताना, त्यांना बीकेसीचे भाडे मिळाले. त्यांनी प्रवाशाला बीकेसी बस थांब्याजवळ सोडले. तेव्हा, त्या प्रवाशाने त्याला नवीन मोबाइल विकत घ्यायचा आहे का? असे विचारले.तेव्हा, शेखने त्यांना होकार दिला. शेखचा मोबाइल क्रमांक घेत, त्याला जास्तीचे भाडे दिले आणि दुपारी भेटण्यास सांगितले. दुपारी अडीचच्या सुमारास शेखने मित्रासोबत त्याची भेट घेतली. प्रवाशासोबत ते कलिना येथे गेले. तेव्हा, शेखने त्याला ६ हजार ७०० रुपये दिले. कलिना येथील मोबाइल दुकानात हवा असलेला मोबाइल न मिळाल्याने त्याने दुसरीकडे जावे लागले असे सांगितले.तेव्हा, शेखने त्याच्या मामाची दुचाकी घेतली.वाटेत त्याने दोघांना थांबविले; आणि दुकानातून मोबाइल घेऊन येतो असे सांगून पळ काढला.

टॅग्स :गुन्हेगारी